Latest

Hardik Pandya Injury : भारताला झटका! हार्दिक पंड्या आणखी दोन सामन्यांतून बाहेर होण्याची शक्यता

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Hardik Pandya Injury : गेल्या आठवड्यात झालेल्या घोट्याच्या दुखापतीतून सावरता न आल्याने स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याही भारताच्या पुढील दोन विश्वचषक सामन्यांमधून बाहेर पडू शकतो. पुण्यात 19 ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्ध स्वतःच्या चेंडूवर क्षेत्ररक्षण करताना पंड्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. त्या सामन्यातून तो बाहेर पडलाच पण त्याच्या पुढील न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीतही तो खेळू शकला नव्हता.

एनसीएच्या सूत्राने पीटीआयला सांगितले की, 'पंड्यावर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) उपचार सुरू आहेत. त्याच्या डाव्या पायाच्या घोट्याची सूज बऱ्यापैकी कमी झाली आहे पण तो लगेच मैदानात सरावासाठी उतरू शकणार नाही. पुढच्या रविवारी भारताचा सामना इंग्लंडशी आहे. अशातच पंड्या या आठवड्यात शेवटीच गोलंदाजी करायला सुरुवात करेल. त्याला दुखापतीतून सावरण्यासाठी वेळ दिला पाहिजे.' हा खुलासा समोर येताच पंड्याला पुढील दोन सामन्यांसाठी विश्रांती दिली जाऊ शकते अशी चर्चा रंगली आहे. त्याला बाद फेरीपूर्वी पूर्णपणे सावरण्याची संधी मिळेल, असेही सांगण्यात येत आहे. (Hardik Pandya Injury)

बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, 'पंड्याची दुखापत ही गंभीर आहे. पायाचे स्नायू मुरगळले होते. या दुखापतीतून तो सावरत आहे. सुदैवाने फ्रॅक्चर झालेले नाही. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाला जास्तीत जास्त खबरदारी घ्यायची आहे. पुढील दोन ते तीन सामन्यांतून तो बाहेर असण्याची शक्यता आहे. त्याने बाद फेरीसाठी पूर्णपणे तंदुरुस्त व्हावे, अशी संघाची इच्छा आहे.'

भारतीय संघाने आत्तापर्यंतचे सर्व पाच सामने जिंकले आहेत. या विजयी घोडदौडीचा फायदा संघाला नक्कीच उपांत्य फेरी गाठण्यात होणार आहे. साखळीफेरीतील भारताचा पुढचा सहावा सामना गतविजेत्या इंग्लंडविरुद्ध आहे. 29 ऑक्टोबरला लखनौमध्ये दोन्ही संघ आमनेसामने असतील. तर 2 नोव्हेंबरला भारत विरुद्ध श्रीलंका ही लढत मुंबईत रंगणार आहे. (Hardik Pandya Injury)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT