Latest

ICC ODI World Cup : रिझवान-शफीकने श्रीलंकेच्या तोंडचा घास हिरावला! पाकचा वर्ल्डकपमधील सर्वात मोठा विजय

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC ODI World Cup : श्रीलंकेने दिलेल्या 345 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा यशस्वीरित्या पाठलाग करताना पाकिस्तानने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सलग दुसरा सामना जिंकला. पाकच्या विजयात अब्दुल्ला शफीक (113) आणि मोहम्मद रिझवान (नाबाद 131) यांच्या चिवट फलंदाजीचा मोलाचा वाटा राहिला. रिझवानला प्लेअर ऑफ द मॅचने गौरविण्यात आले.

विश्वचषकात सर्वात मोठ्या धावांचा पाठलाग

पाकिस्तानने मंगळवारी हैदराबाद स्टेडियमवर विश्वचषकातील सर्वात मोठ्या धावांचा पाठलाग केला. श्रीलंकेने पाकिस्तानला 345 धावांचे लक्ष्य दिले होते. जे पाकिस्तानी संघाने 49 व्या षटकात गाठले. यापूर्वी हा विक्रम आयर्लंडच्या नावावर होता. आयरिश संघाने 2011 च्या विश्वचषकात इंग्लंडसमोर बेंगळुरू येथे 329 धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण आता पाकिस्तानने त्यांना मागे टाकले आहे.

शफीक-रिझवानची मजबूत भागीदारी

345 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात अत्यंत खराब झाली. संघाने 10 षटकांत 48 धावा करताना दोन विकेट गमावल्या. इमाम-उल-हक 12 आणि बाबर आझम 10 धावा करून बाद झाला. 37 धावांत 2 गडी गमावल्यानंतर अब्दुल्ला शफीकने मोहम्मद रिझवानसह पाकिस्तानचा डाव सांभाळला. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 176 धावांची भागीदारी झाली. त्यानंतर मथिश पाथिरानाने 34व्या षटकातील पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला. शफिकने कट शॉट खेळला, पण बॅकवर्ड पॉइंटवर उभा असलेला बदली क्षेत्ररक्षक दुशान हेमंतने उजवीकडे डायव्हिंग करत उत्कृष्ट झेल घेतला. अशाप्रकारे 113 धावा करून शफिक बाद झाला. शफिक बाद झाल्यानंतर मोहम्मद रिझवानने चौथ्या विकेटसाठी सौद शकीलसोबत अर्धशतकी भागीदारी केली. 45व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर शकील बाद झाला. त्याला महिष तिक्ष्णाने दुनिथ वेलालागे करवी झेलबाद केले. शकीलने 30 चेंडूत 31 धावा केल्या. पाकिस्तानची धावसंख्या चार गड्यांच्या मोबदल्यात 308 धावा असताना मैदानात इफ्तिकार अहमद उतरला. त्याने आक्रमक खेळी केली. वेगाने धावा काढण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. तो 22 धावा करून नाबाद राहिला. अखेरीस रिझवाने 48.2 व्या षटकात चौकार मारून पाकिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

मोहम्मद रिझवानच्या 6 हजार धावा पूर्ण

मोहम्मद रिझवानने आपल्या डावात 19 धावा करताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6 हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो पाकिस्तानचा 25 वा फलंदाज ठरला आहे. पाकिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम इंझमाम-उल-हकच्या (495 सामन्यात 20,541 धावा) नावावर आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर युनूस खान (17,790), तिसऱ्या क्रमांकावर मोहम्मद युसूफ (17,134), चौथ्या स्थानावर जावेद मियांदाद (16,213) आणि पाचव्या स्थानावर सलीम मलिक (12,938) यांचा समावेश आहे.

विश्वचषकात भारतीय भूमीवर शतक झळकावणारा शफीक पहिला पाकिस्तानी

पाकिस्तानचा सलामीवीर अब्दुल्ला शफीकने श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक 97 चेंडूत पूर्ण केले. भारतीय भूमीवर विश्वचषकात शतक झळकावणारा तो पहिला पाकिस्तानी खेळाडू ठरला आहे.

तत्पूर्वी, श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर श्रीलंकेच्या फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. लंकन संघाने 50 षटकांत नऊ गडी गमावून 344 धावा केल्या. यासह पाकिस्तानला विजयासाठी 345 धावांचे लक्ष्य मिळाले. श्रीलंकेच्या कुसल मेंडिन्सने सर्वाधिक 122 धावा केल्या. त्याचे हे वनडेतील तिसरे शतक ठरले. तर सदीरा समरविक्रमाने 108 धावांची खेळी केली. त्याने वनडे कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. या दोघांशिवाय पथुम निसांकाने 51 धावांचे योगदान दिले. धनंजय डी सिल्वाने 25 धावा, कर्णधार दासुन शनाकाने 12 धावा आणि दुनिथा वेललागेने 10 धावा केल्या. पाकिस्तानकडून हसन अलीने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. हरिस रौफला दोन विकेट मिळवण्यात यश आले. शाहीन आफ्रिदी, शादाब खान आणि मोहम्मद नवाज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT