पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC Rankings : आयसीसीच्या ताज्या वन-डे क्रमवारीत विराट कोहलीला दोन स्थानांचा फायदा झाला असून तो आता फलंदाजांच्या क्रमवारीत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत शानदार फलंदाजीचा फायदा कोहलीला मिळाला आहे. कोहलीने या मालिकेतील तीन सामन्यांत 283 धावा केल्या, ज्यात दोन शतकांचा समावेश होता. त्याचबरोबर कर्णधार रोहित 10व्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अव्वल स्थानावर कायम आहे.
अव्वल क्रमांकावर असलेल्या बाबर आझमला 887 रेटिंग मिळाले आहे. त्याचबरोबर चौथ्या स्थानावर असलेल्या कोहलीच्या खात्यात 750 रेटिंग आहेत. दुसऱ्या स्थानावर असलेल्या रासी व्हॅन डर डुसेन (766) आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या क्विंटन डी कॉक (759) आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात विराट कोहली केवळ आठ धावा करून बाद झाला. उर्वरीत दोन सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी करून दुसऱ्या क्रमांकावर झेप घेण्याची त्याच्याकडे संधी आहे.
शुबमन गिल, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनाही श्रीलंकेविरुद्धच्या लक्षवेधी कामगिरीचा फायदा झाला आहे. गिलने या मालिकेत एक शतक, एक अर्धशतक झळकावून 69 च्या सरासरीने केलेल्या 207 धावा जमा केल्या. त्यामुळे त्याला फलंदाजांच्या क्रमवारीत एकूण 10 स्थानांनी 26व्या स्थानावर पोहोचण्यास मदत झाली.
त्याचबरोबर मोहम्मद सिराजने शानदार गोलंदाजी केली. त्याने तीन सामन्यांत नऊ विकेट घेत श्रीलंकेच्या फलंदाजांना खूप त्रास दिला. तो या मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता. गोलंदाजांच्या क्रमवारीत त्याने 15 स्थानांची प्रगती केली असून तो तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. सिराजला 685 रेटिंग मिळाले आहेत. या यादीत ट्रेंट बोल्ट (730) अव्वल स्थानी तर जोश हेजलवूड (727) दुसऱ्या स्थानी आहे. श्रीलंकेविरुद्ध अवघ्या दोन सामन्यांत पाच बळी घेत कुलदीपने गोलंदाजांच्या क्रमवारीत सात स्थानांचा फायदा मिळवून 21 वे स्थान गाठले आहे.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत 164 धावा केल्या आणि फलंदाजांच्या क्रमवारीत तो आठव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचा सहकारी डेव्हॉन कॉनवेने तीन सामन्यांत एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले. यापूर्वी तो पहिल्या पहिल्या 100 फलंदाजांमध्येही नव्हता, पण आता त्याने 50 व्या स्थानावर उडी घेतली आहे. पाकिस्तानसाठी, मोहम्मद नवाजने या मालिकेत सहा विकेट घेतल्या. त्याला गोलंदाजांच्या क्रमवारीत 12 स्थानांचा फायदा होऊन तो 28 व्या स्थानावर पोहचला आहे.