Latest

ICC World Cup : न्यूझीलंडने इंग्लंडला लोळवले! 9 विकेट्स, 82 चेंडू राखून दणदणीत विजय

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC World Cup : न्यूझीलंडने 13व्या विश्वचषकाची धमाकेदार सुरुवात केली आहे. त्यांनी गतविजेत्या इंग्लंडचा नऊ गडी आणि 82 चेंडू राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने विश्वचषक 2019 च्या अंतिम फेरीतील पराभवाचा बदला घेतला. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी शानदार प्रदर्शन केले आणि इंग्लिश गोलंदाजांची धु धु धुलाई केली. किवी संघातर्फे डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांनी शतके झळकावून संघाच्या विजयावर शिक्कमोर्तब केला. रचिनला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुरुवारी (5 ऑक्टोबर) न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंअतर प्रथम फलंदाजी करताना इंग्लिश संघाने निर्धारित 50 षटकात 9 गडी गमावून 282 धावा केल्या. इंग्लिश संघाकडून जो रूटने (77) सर्वाधिक धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या किवी संघाने 36.2 षटकात 1 गडी गमावून सहज विजय मिळवला. संघाकडून कॉनवेने सर्वाधिक धावा केल्या. इंग्लंडकडून सॅम कुरनने एकमेव विकेट घेतली.

कॉनवे आणि रचिनची विक्रमी भागीदारी

न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवे आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला रचिन रवींद्र यांनी कमाल केली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 273 धावांची नाबाद भागीदारी केली. वनडे विश्वचषकाच्या इतिहासात न्यूझीलंडकडून कोणत्याही विकेटसाठी खेळलेली ही सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. यापूर्वीचा विक्रम जार्मो आणि हॅरिस (168 धावा, 1996) यांच्या नावावर होता.

कॉनवेचे वनडे कारकिर्दीतील चौथे शतक

कॉनवेने एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील 5 वे शतक केवळ 83 चेंडूत पूर्ण केले. त्याचे या फॉरमॅटमधील इंग्लंडविरुद्धचे दुसरे शतक आहे. 125.62 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत त्याने डावात 121 चेंडूत 152 धावा केल्या. या खेळीत त्याने 19 चौकार आणि 3 षटकारही मारले.

कॉनवेचा विक्रम

152 धावांची नाबाद खेळी करत कॉनवेच्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला गेला. एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात यशस्वी लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वात मोठी खेळी खेळणारा तो फलंदाज ठरला आहे. या बाबतीत त्याने श्रीलंकेच्या लाहिरू थिरिमाने (नाबाद 139) याला मागे टाकले आहे. या यादीत न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग (नाबाद 134) तिसऱ्या, सचिन तेंडुलकर (नाबाद 127) चौथ्या आणि शकीब अल हसन (नाबाद 124) पाचव्या स्थानावर आहेत.

कॉनवेच्या 1000 वनडे धावा पूर्ण

कॉनवेने 126 वी धाव घेताच त्याने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत 1,000 धावा पूर्ण केल्या. तो न्यूझीलंडसाठी सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला आहे. 22व्या डावात त्याने ही कामगिरी केली. याचबरोबर त्याने ग्लेन टर्नर आणि डॅरेल मिशेल (24-24 डाव) यांचा विक्रम मोडला.

23 वर्षीय रवींद्रची शानदार फलंदाजी

23 वर्षीय युवा खेळाडू रवींद्रने शानदार फलंदाजी करत इंग्लंडच्या गोलंदाजीची पिसे काढली. या फॉरमॅटमध्ये त्याने आतापर्यंत खेळलेली ही सर्वोत्तम खेळी आहे. यापूर्वी त्याची सर्वोच्च धावसंख्या 61 होती. त्याने 128.12 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत 96 चेंडूत 123 धावा फटकावल्या. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 5 षटकारही मारले.

रचिनच्या नावावर विक्रमाची नोंद

एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात न्यूझीलंड संघासाठी शतक झळकावणारा रवींद्र हा (23 वर्षे 321 दिवस) सर्वात तरुण फलंदाज तसेच सर्वात जलद शतक (82 चेंडू) करणारा किवी फलंदाज बनला आहे.

इंग्लंडची सुरुवात चांगली झाली, पण…

प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात चांगली झाली होती. पण संघाने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. डेव्हिड मलान (14) आणि जॉनी बेअरस्टो (33) यांनी पहिल्या विकेटसाठी 40 धावा जोडल्या. हे जोडी फुटल्यानंतर इतर फलंदाज संघर्ष करताना दिसले. हॅरी ब्रूक (25) आणि मोईन अली (11) यांनी वेगवान खेळ केला पण मोठी धावसंख्या उभारण्यात ते अपयशी ठरले. रूट आणि कर्णधार जोस बटलर (43) यांनी 5व्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. त्यांच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला आश्वासक धावांचा टप्पा गाठता आला नाही. लियाम लिव्हिंगस्टोनने 20 धावांचे योगदान दिले. आदिल रशीदने नाबाद 15, डेव्हिड मलान आणि सॅम कुरनने 14-14, मार्क वुडने नाबाद 13, मोईन अली आणि ख्रिस वोक्सने 11-11 धावा केल्या.

न्यूझीलंडचा अचूक मारा

या सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या स्फोटक फलंदाजांना मुक्तपणे खेळू दिले नाही. वेगवान आणि फिरकीच्या मिश्रणाने इंग्लिश संघाला खूप त्रास दिला. मॅट हेन्रीने सर्वाधिक 3 बळी घेतले. मिचेल सँटनरने 10 षटकात केवळ 37 धावा दिल्या आणि 2 बळी घेतले. रचिन रवींद्र थोडा महागडा ठरला आणि त्याने 10 षटकांत 76 धावा दिल्या. मात्र, त्याने हॅरी ब्रूकची मोठी विकेट घेतली. ट्रेंट बोल्टने सुरुवातीला धावा खर्च केल्या, पण शेवटच्या षटकात त्याने चांगला मारा केला. ग्लेन फिलिप्सनेही 2 बळी घेतले.

रूटचे वनडेतील 37 वे अर्धशतक

रुटने आपल्या संघाचा डाव सांभाळत एकदिवसीय कारकिर्दीतील 37 वे अर्धशतक झळकावले. त्याने डावात 89.53 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आणि 86 चेंडूत 77 धावा केल्या. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 1 षटकार लगावला. त्याने आतापर्यंत 163 सामन्यांच्या 152 डावांमध्ये 49.02 च्या सरासरीने आणि 86.74 च्या स्ट्राईक रेटने 6,323 धावा केल्या आहेत.

रूटच्या न्यूझीलंडविरुद्ध वनडेमध्ये 1000 धावा पूर्ण

32 वर्षीय रूटने न्यूझीलंडविरुद्ध आपल्या वनडे क्रिकेटमधील एक हजार धावाही पूर्ण केल्या. या संघाविरुद्ध त्याने आतापर्यंत 26 एकदिवसीय सामन्यांमध्ये 47.53 च्या सरासरीने आणि 88.88 च्या स्ट्राईक रेटने 1048 धावा केल्या आहेत. किवी विरुद्ध त्याने 3 शतके आणि 6 अर्धशतके फटकावली आहेत.

बेअरस्टोच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11,000 धावा पूर्ण

इंग्लिश संघाचा सलामीवीर फलंदाज बेअरस्टोनेही या सामन्यात एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11,000 धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो इंग्लंडचा 11वा फलंदाज ठरला. रुटने इंग्लंड संघासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या 18,000 पेक्षा जास्त धावा आहेत. दुसऱ्या स्थानावर संघाचा माजी कर्णधार अॅलिस्टर कुक (15,737) आहे. कूकच्या खालोखाल केविन पीटरसन (13,779) आहे.

बटलरच्या लिस्ट-ए मध्ये 7,000 धावा पूर्ण

इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज बटलरने लिस्ट-ए क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम केला. या डावात त्याने 11वी धाव करताच लिस्ट-ए क्रिकेटमध्ये 7,000 धावा पूर्ण केल्या. त्याने लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सुमारे 45 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 162 धावा आहे. त्याने 118.90 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली आहे. त्याच्या नावावर 13 शतके आणि 41 अर्धशतकांचा समवेश आहेत. हा खेळाडू 46 वेळा नाबाद राहिला आहे.

विश्वचषक स्पर्धेच्या 48 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले

इंग्लंड संघानेही आपल्या डावात एक मोठा विक्रम केला आहे. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 4,658 सामन्यांमध्ये एका संघाच्या सर्व 11 फलंदाजांनी दुहेरी आकडा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे. आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत याआधी असे कधीही घडलेले नव्हते.

SCROLL FOR NEXT