Latest

Renuka Singh : रेणुका सिंह ठरली ‘आयसीसी इमर्जिंग वुमेन्स क्रिकेटर’

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय महिला क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाज रेणुका सिंहने (Renuka Singh) आयसीसीच्या पुरस्कारावर मोहोर उमटवली असून तिला 'इमर्जिंग वुमन क्रिकेटर ऑफ द इयर 2022' म्हणून निवडण्यात आले आहे. हिमाचल प्रदेशच्या या 26 वर्षीय गोलंदाजाने गेल्या वर्षी वन-डे आणि टी-20 च्या एकूण 29 सामन्यांमध्ये 40 विकेट पटकावल्या.

2021 च्या उत्तरार्धात रेणुका सिंहने (Renuka Singh) भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिच्यासाठी 2022 हे वर्ष उत्तम ठरले. तिने वन-डे सामन्यांमध्ये 14.88 च्या सरासरीने आणि 4.62 च्या इकॉनॉमी रेटने 18 विकेट्स घेतल्या. यातील आठ विकेट इंग्लंडविरुद्धच्या दोन सामन्यात आणि सात विकेट श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत मिळवल्या. तर 22 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 23.95 च्या सरासरीने आणि 6.50 च्या इकॉनॉमी रेटने 22 फलंदाजांची शिकार केली. रेणूकाने आयसीसीच्या प्रतिष्ठित पुरस्काराच्या शर्यतीत ऑस्ट्रेलियाच्या डार्सी ब्राउन, इंग्लंडची एलिस कॅप्सी आणि भारताच्याच यास्तिका भाटियाला मागे टाकले.

रेणूकाने (Renuka Singh) आपल्या स्विंग गोलंदाजीने प्रभावित करून प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना खूप त्रास दिला. तिने वन-डे आणि टी-20 या दोन्ही फॉरमॅटमध्ये झुलन गोस्वामीची उणीव जाणवू दिली नाही.

कॉमनवेल्थ गेम्सदरम्यान बर्मिंगहॅममध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात रेणूकाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध भेदक गोलंदाजी केली होती. अॅलिसा हिली, मेग लॅनिंग, बेथ मुनी आणि ताहलिया मॅकग्रा या चार जणींना आपल्या स्विंगने तंबूत पाठवले होते. या गोलंदाजीदरम्यान रेणुकाने 16 डॉट बॉलमध्ये 18 धावांत 4 बळी घेऊन ऑस्ट्रेलियाची अवस्था 34 धावांत 4 बाद 4 अशी केली होती.

SCROLL FOR NEXT