छत्रपती संभाजीनगर : पुढारी ऑनलाईन : मी यंदा दिवाळी साजरी करणार नाही. माझे कुटुंबही दिवाळी साजरी करणार नसल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. तसेच जोपर्यंत माझं आंदोलन सुरू आहे तोपर्यंत मी कुटुंबप्रमुख नाही असे ते म्हणाले. जरांगे यांना आज रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला त्यावेळी ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
महाराष्ट्रातील सर्वांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यामुळे एकानेही आत्महत्या करू नका असे आवाहन जरांगे यांनी यावेळी मराठा तरूणांना केले. सर्वांनी शांततेत आंदोलन करा, शांततेत काम करणाऱ्यांना राज्यात कोणीही काहीही करू शकत नाही अस ते म्हणाले.
ओबीसी नेत्यांवर बोलताना जरांगे यांनी ओबीसी नेत्यांनी राजकारणासाठी हट्टीपणा करू नये, ओबीसी नेत्यांनी हट्टाने मराठा नेत्यांना वेठीस धरू नये असे ते म्हणाले. गोरगरीब धनगर समाजाला न्याय मिळावा ही आमची इच्छा आहे, त्यामुळे धनगर समाजाच्या लढ्यात आम्हीही उतरू अशी भूमीका त्यांनी यावेळी जाहीर केली. भोकरदनमध्ये दादागिरी चालत असेल तर ती आम्ही मोडून काढू असे ते म्हणाले. दरम्यान मी महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. हा दौरा मी दबावासाठी नाही तर लोकांच्या भेटीगाठी करण्यासाठी घेणार असल्याचं ते म्हणाले.
दिवाळीचा सण सुरू असल्याबद्दल विचारलं असता, जरांगे यांनी माझ्या मराठा तरूणांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. त्यामुळे यंदा मी आणि माझे कुटुंबीय दिवाळी साजरी करणार नसल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे.