Latest

पतीचे विवाहबाह्य संबंध नवविवाहितेला जीवन संपविण्‍यास प्रवृत्त करु शकतात : उच्‍च न्‍यायालय

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लग्‍नानंतर काही दिवसांमध्‍येच पती विवाहबाह्य असल्‍याची माहिती मिळणे आणि त्‍याच्‍याकडून मिळणार्‍या वाईट वागणूक नवविवाहितेला जीवन संपविण्‍यास प्रवृत्त करु शकते, असे निरीक्षण नुकतेच दिल्‍ली उच्‍च न्‍यायालयाने नोंदवले. पत्नीच्या मृत्यूप्रकरणी भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम ४९८ अ (क्रूरता) आणि ३०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आरोपीचा जामीन याचिका फेटाळताना न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांनी वरील निरीक्षण नोंदवल्‍याचे वृत्त 'बार अँड बेंच'ने दिले आहे.

१८ मे २०२२ रोजी दिल्‍लीतील तरुण-तरुणीचे लग्‍न झाले. यानंतर नवविवाहितेने लग्‍नाच्‍या १३ व्‍या दिवशी आपले जीवन संपवले होते. पतीचे विवाहबाह्य संबंध असल्‍याचा आरोप नवविवाहितेच्‍या वडिलांनी केला होता. त्‍यांनी दिलेल्‍या तक्रारीनुसार आरोपी पतीला अटक झाली. त्‍याने जामीनासाठी दिल्‍ली उच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल केली होती. यावर न्‍यायमूर्ती स्‍वर्ण कांता शर्मा यांच्‍या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

जोडीदाराच्या वाईट वागणुकीमुळे एखादी स्त्री टोकाचे पाऊल उचलू शकते…

न्‍यायमूर्ती शर्मा यांनी स्‍पष्‍ट केले की, या प्रकरणातील आरोपीविरुद्ध विवाहबाह्य संबंध असल्याचे विशिष्ट आरोप आहेत. पतीच्‍या कृत्‍यामुळे नवविवाहितेवर दररोज प्रचंड ताण आणि मानसिक आघात होतो. जोडीदार व्‍यभिचारी असेल तर त्‍याचा परिणाम व्यक्तीच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर गंभीर होतो. हा मोठा धक्‍का असू शकतो. कारण एखाद्या महिलेने विश्वासाने विवाह केला असेल जो तिच्या पतीच्या विवाहबाह्य संबंधांच्या खुलासामुळे भंग पावू शकतो. विश्वासार्हतेचा शोध घेताना झालेल्‍या भावनिक आघात आणि त्यानंतरच्या जोडीदाराच्या वाईट वागणुकीमुळे एखादी स्त्री आपले जीवन संपविण्‍यासारखा निर्णय घेण्‍याचे टोकाचे पाऊल उचलू शकते," असेही न्यायमूर्तींनी स्‍पष्‍ट केले.

नवविवाहितेच्‍या आईचा जबाब ठरला महत्त्‍वपूर्ण

पतीच्‍या विवाहबाह्य संबंधाची माहिती नवविवाहितेला मिळाली. तिने विवाहबाह्य संबंधांवर आक्षेप घेतला. यानंतर पतीने तिला मारहाण केली. याचा मोठा मानसिक धक्‍का तिला बसला. विवाहानंतर अवघ्या १३ दिवसांत तिने आपले जीवन संपवले, असे तिच्‍या आईने दिलेल्‍या जबाबात म्‍हटले होते. तो महत्त्‍वपूर्ण ठरला. सर्व बाबींचा विचार करुन न्‍यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT