Latest

नंदुरबार पोलिसांकडून निराधारांना ‘माणुसकीची उब’

गणेश सोनवणे

नंदुरबार – ज्यांच्याकडे घर नाही, अंगावर थंडीचे कपडे नाहीत अशा फुटपाथवर किंवा उघड्यावर भर थंडीत निजणाऱ्या व राहणा-या शेकडो निराधारांना ब्लॅंकेटचे वाटप करीत कायदा सुव्यवस्था कठोरपणे हाताळणाऱ्या नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने पुन्हा एकदा पोलीस दलाकडून माणुसकीची उब सुद्धा दिली जाते, याचा प्रत्यय दिला.

पोट भरण्यासाठी स्थलांतर करुन उघड्यावर आयुष्य जगणाऱ्यांना राहण्यासाठी घर नसल्यामुळे रात्रीच्यावेळी रेल्वे स्टेशन, बस स्थानक किंवा रस्त्याच्या कडेलाच राहावे लागते. रक्त गोठवणाऱ्या थंडीत उघड्यावर झोपलेली कोवळी मुले मात्र पाय पोटात घेऊन कुडकुडत झोपलेली असतात. सध्या कडाक्याची थंडी सुरु असून नंदुरबार जिल्ह्याचा पारा देखील खाली घसरला आहे. माणुसकीच्या नात्याने याचा विचार करीत फुटपाथवर किंवा उघड्यावर राहणाऱ्या निराधारांना ब्लॅकेट व चादरचे वाटप करुन जिल्हा पोलीस दलाची मायेची ऊब मिळावी अशी संकल्पना नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांचे समोर मांडली. त्यांच्या या संकल्पनेला जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देवून आप- आपल्या पोलीस ठाणे हद्दीत तसेच नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दोन दिवसापूर्वी मध्यरात्री नंदुरबार शहरातील रेल्वे स्टेशन, बस स्थानक व इतर ठिकाणी थंडीत कुडकुडत फुटपाथवर किंवा उघड्यावर राहणाऱ्या निराधारांना ब्लॅकेट व चादरचे वाटप केले. जिल्हा पोलीस दलाने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी जिल्हा पोलीस दलाच्यावतीने नंदुरबार शहर पोलीस ठाणे-90, उपनगर पोलीस ठाणे-85, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे-60, नवापूर पोलीस ठाणे-90, विसरवाडी पोलीस ठाणे-70, शहादा पोलीस ठाणे- 90, सारंगखेडा पोलीस ठाणे-60, धडगांव पोलीस ठाणे-80, म्हसावद पोलीस ठाणे-90, अक्कलकुवा पोलीस ठाणे-70, तळोदा पोलीस ठाणे-70, मोलगी पोलीस ठाणे-50 आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून-110 असे एकूण 1015 निराधारांना ब्लॅकेट व चादर वाटप करण्यात आले आहे.

विशेष उल्लेखनीय आहे की, नंदुरबार जिल्हा पोलीस दल गेल्या दोन वर्षापासून सातत्याने असे वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. नुकतेच नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पदावरून बदलून गेलेले पी आर पाटील यांनी त्या संकल्पना राबवण्यात पुढाकार घेतला आणि पोलीस दलाला सामाजिक कार्याचा चेहरा प्राप्त करून दिला आहे. मागील वर्षी देखील नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने संपूर्ण जिल्ह्यात रात्री नववर्षाचे स्वागत होत असतांना उघड्यावर राहणाऱ्या सुमारे 1500 निराधारांना ब्लॅकेट व चादर वाटप केले होते. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.

हेही वाचा ;

SCROLL FOR NEXT