Latest

‘काँग्रेस छोडो’!

Arun Patil

काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची विरोधकांच्या 'इंडिया' महाआघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एक प्रकारे विरोधी फळीचे नेतृत्व करण्याची संधीच काँग्रेसला मिळाली असली, तरी काँग्रेस आणि पक्षाचे नेतृत्व या संधीला कशी दिशा देणार हे पाहावे लागेल. कारण काँग्रेस पक्षालाच सातत्याने तडे जाऊ लागल्याचे वास्तव नेतृत्वाला सतावते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपमुळे लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे, अशी टीका खर्गे आणि विशेषतः राहुल गांधी हे सातत्याने करत असले, तरी काँग्रेस पक्षात राहिल्यास आपल्या राजकीय अस्तित्वालाच धोका निर्माण होईल, अशी अनेक नेत्यांची भावना आहे! उलट राहुल यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट केल्यास किंवा पुन्हा त्यांना काँग्रेस अध्यक्षपदी बसवल्यास, त्याचा आम्हाला फायदाच होईल, अशी उपरोधिक टीका भाजपतर्फे केली जात असते.

गेल्या काही वर्षांत कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद, ज्योतिरादित्य शिंदे, कॅप्टन अमरिंदर सिंग, आरपीएन सिंग, सुनील जाखड, हार्दिक पटेल, जितिन प्रसाद, टॉम वडक्कम, अल्पेश ठाकूर तसेच काँग्रेस नेते ए. के. अँटनी यांचे चिरंजीव अनिल अँटनी यांनी काँग्रेसचा त्याग केला. सिब्बल यांनी समाजवादी पार्टीच्या समर्थनाने राज्यसभेची खासदारकी मिळवली; तर गुलाम नबी आझाद यांनी 'जे अँड के डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी'ची स्थापना केली. इतर सर्व नेत्यांनी भाजपात प्रवेश करून महत्त्वाची पदे मिळवली. ज्योतिरादित्य यांना तर केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रिपद मिळाले. ज्योतिरादित्य, आरपीएन सिंग, जितिन प्रसाद हे राहुल ब्रिगेडमधील आघाडीचे नेते.

आता दक्षिण मुंबई लोकसभेची जागा काँग्रेसच्या वाट्याला येणार नाही हे स्पष्ट झाल्यामुळे, माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनी सोयीचे राजकारण करताना काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. देवरा यांचे वडील मुरली देवरा केंद्रात मंत्री, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि इंदिरा गांधी – सोनिया गांधी परिवाराच्या निकटवर्तीय होते. अनेक वर्षे मुंबई काँग्रेसचे अध्यक्षही होते. मिलिंद हे दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले. परंतु 2014 आणि 2019 मध्ये शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी त्यांचा पराभव केला. सावंत यांना मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्रिपदही मिळाले होते. परंतु शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. महाविकास आघाडीने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेसाठीच ही जागा सोडल्यामुळे तेथून सावंत हेच निवडणूक लढवणार हे स्पष्ट होते. अशावेळी आपल्या भवितव्याचे काय, असा प्रश्न देवरा यांच्यापुढे होता. वास्तविक मुरली देवरा यांना मुंबईच्या महापौरपदी बसण्याची संधी शिवसेनेच्या पाठिंब्यामुळेच मिळाली होती.

मिलिंद देवरा यांनी उबाठा सेनेत येण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु त्यांना दक्षिण मुंबईतून खासदारकी हवी होती आणि सावंत यांना डावलणे 'उबाठा' सेनेला शक्य नव्हते. मिलिंद हे थेट भाजपमध्येही जाऊ शकले असते. पण भाजपच्या पारड्यात दक्षिण मुंबईची जागा येणार नसावी, म्हणून त्यांना शिंदे यांच्या पक्षात जाण्याची सूचनाही केली गेली असावी. मविआमध्ये दक्षिण मुंबईची जागा काँग्रेसला दिली जावी, यासाठी काँग्रेस नेत्यांनीही आग्रह न धरल्यामुळे देवरा नाराज झाले. पक्षातही आपल्याला फारसे स्थान मिळत नाही, अशी देवरा यांची तक्रार होतीच. आता तीच काँग्रेस सोडताना पक्षात गुणवत्तेला स्थान नाही आणि व्यापारी व उद्योगपतींना पक्षात केवळ शिव्याशाप दिले जातात, अशी टीका त्यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ते उमेदवारीसाठी हे पाऊल उचलणार हे स्पष्टच होते. त्यासाठी त्यांनी नेमकी वेळ निवडली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मणिपूर ते मुंबई या भारत जोडो न्याय यात्रेस प्रारंभ झाला त्याच 'मुहूर्ता'वर हे पक्षांतर घडवून आणले, असा आरोप त्याचमुळे काँग्रेसने केला आहे. आपल्या केवळ ज्येष्ठ नेत्यांनाच नव्हे, तर तरुण नेत्यांनाही सांभाळण्यात काँग्रेस कमी पडत आहे.

तरुणांच्या आशा-आकांक्षा, आर्थिक विकास, राष्ट्रवाद यासाठीचे राजकारण करण्याची आवश्यकता असताना त्याकडे दुर्लक्ष केले जाते आहे. त्यावर देवरा यांनी बोट ठेवताना 'काँग्रेस पक्ष मात्र सतत विरोधकांवर व्यक्तिगत हल्ले चढवणे, प्रत्येक गोष्टीला विरोध करणे आणि अन्याय, अन्याय म्हणून आक्रंदन करणे, यावर भर देत असतो', अशी टीका पक्षत्याग करताना केली. परंतु त्याचवेळी देवरा यांना हा साक्षात्कार इतक्या उशिरा कसा झाला, हा प्रश्न आहेच. आपल्या राजकीय लाभाचा विचार करूनच 'मधु मिलिंद जय जय' करत, त्यांनी पक्षांतर केले. 2019 मध्ये काँग्रेसने शिवसेनेबरोबर मैत्री केली आणि हा पक्ष ठाकरे सरकारमध्ये सामील झाला, तेव्हाच त्यास आपण विरोध केला असल्याचे देवरा यांनी म्हटले होते. परंतु मग त्यांनी त्याचवेळी राजीनामा द्यायला हवा होता आणि आज त्याच पक्षात, म्हणजे शिंदे यांच्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला.

कोणत्याही निवडणुकांपूर्वी अशी पक्षांतरे होतच असतात. परंतु देशपातळीवर आणि महाराष्ट्रातही काँग्रेसला गळती लागणार असेल, तर त्या पक्षाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहेच. 'ये तो एक ट्रेलर था, पिक्चर तो अभी बाकी है', असे सूचक वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवरा यांचे आपल्या पक्षात स्वागत करताना केले. एकीकडे उबाठा सेनेचे अनेक नगरसेवक शिंदे यांच्या पक्षात आले आहेत; तर तीन राज्यांतील दमदार विजयानंतर काँग्रेसचे आणखी काही आमदार भाजपत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधान परिषदेच्या जून 2022 मध्ये झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसची सात ते आठ मते फुटली होतीच. त्यामुळे 'भारत जोडो'सारखी यात्रा काढतानाच, 'काँग्रेस छोडो'वाल्यांना रोखणार कसे? हा खरा प्रश्न आहे.

SCROLL FOR NEXT