Latest

Muharram Chonge Recipe : मोहरमच्या काळात ‘चोंगे’ना महत्त्व, कसे बनवायचे जाणून घ्या

स्वालिया न. शिकलगार

स्वालिया शिकलगार – पुढारी ऑनलाईन डेस्क : मोहरमच्या काळात 'चोंगे'ना (पदार्थ) अनन्यसाधारण महत्त्व आहे. (Muharram  Chonge Recipe) मोहरम पीरपंजे ताबूत विसर्जन झाले की, 'चोंगे' आणि 'मलिदा' या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. चोेंगे तुम्ही घरी बनवू शकता. चोंगे कसे बनवायचे जाणून घेऊया. (Muharram Chonge Recipe)

साहित्य :

गव्हाचे पीठ

वेलदोडे

साखर

वाळलेले खोबरे

भाजलेले तीळ

चेरी (आवडीनुसार)

फुटाण्याची डाळ

तूप

गुळ

तेल

मीठ

पाणी

चोंगे करण्याचा पाट

कृती :

प्रथम चपातीचे पीठ मळतो तसे कणिक मळून घेऊन तेलाचा हात लावून १५ मिनिटांसाठी ठेवून द्यावे. खिसणीवर जितके हवे तेवढे वाळलेले खोबरे खिसून घ्यावे. एक भांडे घेऊन गॅसवर मंद आचेवर पांढरे तीळ खरपूस भाजून घ्यावे. गूळदेखील खिसून घेऊन वाटीत काढून घ्यावा. आता एका मोठ्या बाऊलमध्ये वाळलेल्या खोबऱ्याचा खिस, साखर, तीळ मिक्स करून घ्यावे. त्यात वरून एक वेलदोडा बारीक करून टाकावा. तसेच फुटाण्याची डाळ आणि हलकी चिमुटभर बडीशेप टाकावी. हे सर्व मिश्रण एकत्र करून ठेवावे.

बाजारात चोंगे करण्याचे लाकडी पोळपाट किंवा दगडी पोळपाट मिळतो. या पाटावर चोंगे हा पदार्थ केले जातो. हे पोळपाट नेहमीच्या पोळपाटापेक्षा आकाराने कमी आणि गोल असतो. दगडी किंवा लाकडी पोळपाटावर नक्षीकाम कोरलेले असते. ज्यामुळे जेव्हा चपाती लाटू तेव्हा ही नक्षी चपातीवर उमटते. आणि चपाती डिझाईनवाली तयार होते.

आता कणिक घेऊन गोल चपाती दगडी पाटावर लाटून घ्या. तुम्हाला पातळ किंवा जाडसर , जशी हवी आहे तशी चपाती लाटून घ्यावी. तव्यावर तेल लावून दोऩ्ही बाजूंनी भाजून घ्यावे. एका प्लेटमध्ये ही गरमागरम चपाती काढून घेऊन त्यावर एक चमचा तूप टाकावे. त्यावर वरील तीळ, खोबरे, साखरेचे मिश्रण घेऊन पसरावे. वरून आवडत असेल तर चेरी टाकावी. तुमचे चोंगे तयार झाले. तुम्ही वरून ड्रायफ्रुटदेखील घालू शकता.

तुमच्याकडे चोंगे करण्याचा पाट नसेल तर तुम्ही साध्या पोळपाटावरदेखील ही रेसिपी करू शकता.

SCROLL FOR NEXT