Latest

Shardiya Navratri 2022 | घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या पूजा विधी

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : यंदा २६ सप्टेंबर २०२२ रोजी शारदीय नवरात्रोत्सवास (Shardiya Navratri 2022) प्रारंभ होत आहे. त्यानिमित्त जाणून घेऊया घटस्थापना कशी करावी?. देवघराच्या उजव्या बाजूला वारुळाच्या मातीची वेदी करून त्यावर शुद्ध जलाने भरलेल्या कलशाची स्थापना करून त्यावर लहान ताम्हनात तांदूळ घालून वरती देवीची मूर्ती किंवा मूर्ती नसेल तर नारळ ठेवून पूजा करणे म्हणजे घटस्थापना होय. नवरात्रात प्रथमदिनी घटस्थापना करून नऊ दिवस तो घट तसाच ठेवून त्याची सकाळ-संध्याकाळ पूजा करायची असते. कलशात शुद्ध जल, गंध, शक्य तितक्या वनौषधी, दुर्वा, दोन सुपांच्या तांब्याची पाच नाणी, सोन्याचे या रुप्याचे एक नाणे किंवा सव्वा रुपया, त्यावर पंचपल्लव किंवा आंब्याचा पाच पानांचा टाळ ठेवून वरती ताम्हनात तांदूळ, त्यावर आलवण, आलवणावर श्रीयंत्र आणि त्यावर देवीची मूर्ती ठेवून वरुणाची पूजा करतात. कलश ज्या मातीच्या वेदीवर स्थापन केला जातो, त्या मातीत सप्तधान्ये घालून त्यावर हळद घातलेले पाणी अंकुर रोपणासाठी शिंपडतात. पुढे दररोज हे पाणी शिंपडावे लागते.

घटस्थापना झाल्यावर अखंड नंदादीपाची स्थापना करतात. घटाशेजारी नवरात्राचे नऊ दिवस नंदादीप अखंड तेवत ठेवावा. नवरात्रपूजेतील हा महत्त्वाचा विधी आहे. नंदादीपात मोठी वात घालावी. ती तुटू नये, तिची ज्योत विझू नये याची रात्रंदिवस दक्षता घ्यावी. वात पुढे सारताना ती बोटाने सारू नये. वात पुढे सारण्यासाठी टीचभर लांबीची एक काडी किंवा लोखंडाशिवाय दुसऱ्या धातूची तार ठेवावी. दीपस्थापना करताना आधी त्या जागेची स्थलपूजा करावी. नंतर दीपपूजा करावी. (Shardiya Navratri 2022)

SCROLL FOR NEXT