Latest

किशोरवयीन मुलांच्या ‘मूड स्विंग’ला कसे हाताळावे?

Arun Patil

वाढत्या वयाची मुलं असतील, तर त्यांच्या शारीरिक व भावनिक स्थित्यंतराकडेही पाहणे गरजेचे ठरत असते. मुलं जेव्हा किशोरवयीन होतात तेव्हा त्यांच्यामध्ये कित्येक प्रकारचे बदल होत असतात. फक्त बाहेरून दिसणारेच बदल नव्हे, तर शरीराच्या आत आणि मनातही अनेक बदल होत असतात. अशा वेळी नेहमी हसत- खेळत राहणारा मुलगाही चिडचिड करू लागतो, तर कधी नेहमी उत्साही असणारी मुलगीदेखील शांत होते. अशा स्थितीमध्ये आई-वडिलांसाठी पालक म्हणून मुलांबरोबर कसे वागावे? कसे बोलावे तेच समजत नाही. ही समस्या तेव्हा आणखी वाढते जेव्हा किशोरवयीन मुलांचा मूड वारंवार बदलतो तेव्हा. ते कधी एकदम शांत होतात, तर कधी खूप चिडचिड करतात. ते एखाद्या क्षणी पटकन खूश होतात, तर दुसर्‍या क्षणी एकटे राहावे वाटते. किशोरवयीन मुलं नेहमी पालकांपासून दूर राहतात. मुलांचे पालकांबरोबर वाद वाढत जातात आणि कित्येकदा पालक मुलांना गरजेपेक्षा जास्त ओरडतात. जर तुम्हीदेखील किशोरवयीन मुलांचे पालक असाल, तर मुलांमध्ये मूड स्विंग होत असताना त्यांच्याबरोबर कसे वागावे? हे जाणून घ्या…

मुलांची अवस्था समजून घ्या

किशोरवयीन मुलांचा राग किंवा चिडचिड हार्मोन्समुळे वाढते, हे पालकांनी समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. किशोरवयात शरीरात इतके बदल होतात की, आत्मसंयम राखणे कठीण होते. परंतु, तुम्हाला तुमचा संयम राखावा लागेल आणि त्यांची स्थिती समजून घ्यावी लागेल. त्यांना एखाद्या गोष्टीवरून ओरडणे किंवा नको ते टोमणे मारणे, हा काही या समस्येवरचा उपाय नाही.

मुलांबरोबर बोलण्याचा प्रयत्न करा

मुलांना, विशेषत: किशोरवयीन मुलांना त्यांच्या पालकांशी बोलण्यास किंवा सर्व काही सांगण्यास संकोच वाटतो आणि म्हणूनच ते त्यांच्या समस्या त्यांच्या पालकांपासून लपवू लागतात. जर तुम्हाला तुमचे मूल गोंधळलेले आहे असे वाटले, तर त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा. तो मोकळेपणाने बोलण्यास सुरुवात करेल. परंतु, जर मुलाला बोलायचे नसेल तर त्याच्यावर दबाव टाकू नका. मुलाच्या 'नकारा'चा आदर करा. असे होऊ नये की, जर मुलाने काही सांगण्यास नकार दिला तर तुम्ही त्यालाच ऐकवत बसाल.

आगीत तेल टाकण्याचे काम करू नका

किशोरवयीन मुले एखाद्या गोष्टीवर रागराग करून ओरडत असतील, घर डोक्यावर घेतात असतील किंवा एखाद्या गोष्टीबद्दल नाराज होऊन स्वत:ला दोष देत असतील, तर अशा स्थितीमध्ये आगीत तेल टाकण्याचे काम करू नका. स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा आणि समस्येचे निराकरण करा. दोन्ही बाजूंनी वाद घातला तर परिस्थिती आणखी बिघडते.

मुलांचे मूड स्विंग्स हाताळायला शिका

पालक या नात्याने तुमच्या मुलाला किशोरवयीनची जाणीव करून देणे, हे तुमचे कर्तव्य आहे. त्याला सांगा की, या वयात शरीरात अनेक बदल होतात आणि ते सामान्य आहे. मूड स्विंग हा किशोरवयाचा एक भाग आहे आणि त्याचे मुख्य कारण हार्मोन्स आहे. त्याने आपल्यावर वर्चस्व गाजवण्याऐवजी या मूड स्विंग्जवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे न केल्याने, किशोरवयीन मुले केवळ कुटुंबातीलच नव्हे, तर बाहेरील मित्रांसोबतही त्यांचे संबंध खराब करू शकतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT