Latest

आकाशगंगेत सूर्य किती वेगाने करतो प्रवास?

Arun Patil

वॉशिंग्टन : अंतराळाच्या अनंत पसार्‍यात आपण कुठे आहे हे पाहायला गेलो तर कुणीही थक्क होऊ शकते. आपली पृथ्वी ज्या सौरमालिकेचा एक भाग आहे अशा लाखो सौरमालिका 'मिल्की वे' नावाच्या एकाच आकाशगंगेत आहेत. ब्रह्मांडात अशा 'मिल्की वे'सारख्या अब्जावधी आकाशगंगा आहेत! 'मिल्की वे' मध्ये आपला सूर्य किती वेगाने प्रवास करीत असतो हे जाणून घेणेही रंजक ठरेल.

तुम्हाला माहिती आहे का, आपली पृथ्वी एकाच वेळी सूर्याभोवती फिरत असतानाच 'मिल्की वे'मधूनही प्रवास करीत असते. याचे कारण म्हणजे आपली सौरमालिका आणि सूर्यही असा फिरत असतो. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो व पृथ्वी सूर्याभोवती फिरते तसे आपला सूर्यही मिल्की वेमध्ये गोलाकार फिरत असतो. अधिक स्पष्टपणे सांगायचे तर सूर्य हा 'मिल्की वे'च्या केंद्रभागी असलेल्या शक्तिशाली कृष्णविवराभोवती फिरत असतो. सूर्य या कृष्णविवराभोवती किती वेळा फिरतो, त्याची गती काय असते हे जाणून घेऊया.

आपल्या ग्रहमालिकेतील ग्रह जसे सूर्याभोवती विशिष्ट कक्षेतून फिरतात तसाच सूर्यही कृष्णविवराभोवती एका कक्षेतून फिरतो, मात्र ही कक्षा अत्यंत दीर्घ असते व ती कमी स्थिर असते. त्यामुळे आकाशगंगेच्या केंद्राभोवती सूर्य किती वेळा फिरतो याची गणना करणे कठीण आहे. सध्या सूर्य आणि सौरमालिका आकाशगंगेत ताशी 7,20,000 किलोमीटर इतक्या वेगाने भ्रमण करीत आहे. आपल्याला हा वेग प्रचंड वाटेल, पण सूर्यासारखे काही तारे ताशी 8.2 दशलक्ष किलोमीटर इतक्या वेगानेही फिरतात. सध्याच्या वेगाने आपल्या सूर्याला 'मिल्की वे'ची एक प्रदक्षिणा काढण्यास 23 कोटी वर्षे लागतात.

SCROLL FOR NEXT