Latest

Israel : इस्रायलकडे हवेपासून पाणी तयार करण्याचे आहे ‘हे’ अनोखे तंत्रज्ञान

Arun Patil

तेल अवीव : सध्या इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाच्या बातम्या आपल्याला दररोज वाचायला मिळत आहेत. तथापि, इस्रायलची चर्चा केली जाते ती तिथल्या वैज्ञानिक, संरक्षण आणि कृषी क्षेत्रातील अजोड कामगिरीची. यातील एक अनोखे तंत्रज्ञान म्हणजे हवेपासून पाणी तयार करणे. तेल अवीव विद्यापीठातील संशोधनाच्या निष्कर्षांनुसार, हवेत प्रदूषण असले तरीही, या अनोख्या तंत्रज्ञानाद्वारे जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांची पूर्तता करणारे पिण्यायोग्य पाणी तयार केले जाऊ शकते.

'वॉटरजेन' नावाच्या इस्रायली कंपनीने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाद्वारे हवेपासून पिण्यायोग्य पाणी तयार करता येते. अर्थात, इस्रायलखेरीज भारतासह जगातील अनेक देशांतील कंपन्या या दिशेने वाटचाल करत असून, त्यांना लक्षणीय यशही मिळाले आहे. इस्रायलमधील कंपनीने हवेपासून पाणी तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले असून, कंपनीस त्याचे आंतरराष्ट्रीय पेटंटही मिळाले आहे. हवेपासून पाणी तयार करण्याच्या या तंत्राला 'अ‍ॅटमॉस्फेरिक वॉटर जनरेशन' (वातावरणातून पाण्याची निर्मिती) असेही संबोधले जाते.

त्यानुसार मशिनद्वारे हवा शोषली जाते. एका विशिष्ट प्रकारचे एअर फिल्टर त्यातील प्रदूषके काढून टाकते आणि फक्त स्वच्छ हवा आत घेतली जाते. नंतर ऊर्जा विनिमयाद्वारे पाणी वेगळे करून ते टाकीत गोळा केले जाते. यानंतर ते अल्ट्राव्हायोलेट किरणांद्वारे त्यातील अशुद्ध भाग काढून ते पिण्यायोग्य बनवले जाते. वातावरणात 13 अब्ज टन ताजे पाणी असून, ते या तंत्रज्ञानाच्या मदतीने वापरता येऊ शकते. जगातील आठ अब्ज लोकांची तहान भागवण्यासाठी ते पुरेसे आहे. मुख्य म्हणजे यामुळे हवामानावर कोणताही विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाही. लोकसंख्या वाढीमुळे जगातील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांवर सतत ताण पडत आहे. परिणामी, प्रदूषण होत आहे. पाण्याचे वितरण करणार्‍या पाईपलाईन कालांतराने जुन्या, खराब होतात आणि त्याला सतत साफसफाईची आवश्यकता असते.

पाईपलाईनमध्ये वेळोवेळी बिघाड झाल्यामुळे प्रदूषके मिसळली जातात, अशावेळी या प्रकारची स्वतंत्र यंत्रणा नागरिकांच्या गरजा पूर्ण करू शकते.

भारतासह जगातील अनेक देशांमध्ये जलप्रदूषणामुळे काही भागांत भूजल प्रदूषित झाले आहे. त्यामुळे अशा प्रदेशात ही यंत्रणा उपयुक्त ठरू शकते.

सीरिया आणि गाझामध्ये युनिटस्

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, जगातील सुमारे दोन अब्ज नागरिकांना दूषित पाणी प्यावं लागत आहे. त्यामुळे टायफॉईड आणि कॉलरासारखे आजार होऊ शकतात. प्रदूषित पाण्यामुळे जगभरात दरवर्षी सुमारे पाच लाख लोकांचा मृत्यू होतो. आंतरराष्ट्रीय धर्मादाय संस्थांच्या मदतीने, 'वॉटरजेन'ने नागरी युद्ध आणि युद्धामुळे प्रभावित झालेल्या लोकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी देण्याकरिता सीरियातील रक्का येथे स्वतःचा प्लांट उभा केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT