Latest

अंतराळात कसे कापतात केस?

Arun Patil

न्यूयॉर्क : पृथ्वीच्या कक्षेत फिरत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अनेक अंतराळवीर दीर्घकाळासाठी राहत असतात. शून्य गुरुत्वाकर्षण असलेल्या अशा ठिकाणी दैनंदिन कामे कशी केली जात असतील याचे सर्वसामान्य लोकांना कुतुहल असते. त्याबाबतचे अनेक व्हिडीओही अंतराळवीर वेळोवेळी शेअर करीत असतात. आता अंतराळात केस कसे कापले जातात हे सांगणारा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. संयुक्त अरब अमिरातीचा अंतराळवीर सुल्तान अलनेयादी गेल्या चार महिन्यांपासून या अंतराळ स्थानकात राहत आहे. त्यानेच आपल्या देशातील लोकांच्या प्रश्नांना उत्तर देताना ही माहिती दिली.

यावेळी सुल्तानला अनेक प्रश्न विचारण्यात आले. पृथ्वीवर राहण्याच्या तुलनेत अंतराळात राहणे हे अतिशय वेगळे असते असे त्याने सांगितले. 42 वर्षांच्या सुल्तान अलनेयादी याने ट्विटर अकाऊंटवर याबाबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्याने सांगितले, प्रत्येक अंतराळवीराकडे एक पर्सनल हायजीन किट असते. अनेक लोक विचारतात की अंतराळात केस कसे कापले जातात. अर्थातच याठिकाणी सलून नाही. याठिकाणी आम्ही आमचे केस स्वतःच कापतो किंवा अन्य सहकार्‍यांना त्यासाठी मदत करतो.

सहा मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये तो आपले केस आणि दाढी ट्रीमरने कापत असताना दिसतो. या ट्रीमरमध्ये एक सक्शन डिव्हाईस लावलेले आहे जे केस खेचून घेते. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गुरुत्वाकर्षण नगण्य असते. त्यामुळे याठिकाणी सर्व वस्तू अंतराळात तरंगत असतात. 'नासा'ने दिलेल्या माहितीनुसार केस जर सक्शनशिवाय कापले तर ते स्पेस स्टेशनच्या यंत्रांमध्ये अडकू शकतात. तसेच ते एअर फिल्टरमध्येही अडकून राहू शकतात. अंतराळवीरांच्या डोळ्यांमध्येही हे केस जाण्याची शक्यता असते.

SCROLL FOR NEXT