पुढारी ऑनलाईन डेस्क : हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी फ्रान्सचा 8-0 ने धुव्वा उडववून विजयी सलामी दिली. भुवनेश्वरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या क्वार्टरपासूनच प्रतिस्पर्धी संघावर दडपण निर्माण केले, जे शेवटपर्यंत कायम ठेवण्यात ते यशस्वी झाले. संघाकडून टॉम क्रॅग आणि जेरेमी हेवर्ड यांनी प्रत्येकी तीन गोल केले. तर फ्लॅन ओगिल्वी आणि टॉम विकहॅम यांनी प्रत्येकी एक गोल केला. संपूर्ण सामन्यात फ्रान्सचा संघ संघर्ष करताना दिसला. त्यांना एकही गोल करता आला नाही.
पहिल्या क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या टॉम क्रॅगने गोल नोंदवला. त्याच्या मैदानी गोलने पहिल्या क्वार्टरमध्ये संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलियाने झंझावाती कामगिरी करत झटपट तीन गोल केले. यामध्ये फ्लॅन ओगिल्वीने 26 व्या मिनिटाला मैदानी गोल केला. तर त्यानंतर काही सेकंदांच्या अंतराने 26 व्या आणि 28 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर फ्रेंचांचे गोलजाळे भेदले. अशाप्रकारे दुसऱ्या क्वार्टरच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाने 4-0 अशी आघाडी घेतली.
तिसऱ्या क्वार्टरमध्येही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आक्रमक खेळ सुरू ठेवला. प्रत्युत्तरादाखल फ्रेंच खेळाडू झुंज देत होते, पण गोल करण्यात त्यांना यश आले नाही. या दरम्यान, ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या क्वार्टरमध्ये तीन गोल केले. टॉम क्रॅगने 31 आणि 44 तर जेरेमी हेवर्डने 38 व्या मिनिटाला गोल केले. तर चौथ्या क्वार्टरमध्ये टॉम विकहॅमने 53व्या मिनिटाला संघाचा आठवा गोल नोंदवला. अशा प्रकारे अ गटातील दुसऱ्या सामन्यात बलाढ्य कांगारू संघाने फ्रान्सवर एकतर्फी विजय मिळवून तीन गुणांची कमाई केली आणि ग्रुप ए मध्ये अव्वलस्थानी पोहचले.