2017 मधील रईस या चित्रपटानंतर बॉलिवुडचा किंग शाहरुख खान याला एका सुपर हिटची आवश्यकता होतीच. मध्यंतरी किंग खानचा पॉजही जरा लांबलेलाच होता. चाहत्यांना त्याने हुरहूर लावलेली होती… आणि 2023 मध्ये जणू पडदा फाडायलाच त्याचा पठाण हा चित्रपट आला. चित्रपट न पाहाताच केवळ रिल पाहून काहींनी पठाणला विरोध सुरू केलेला होता. (Hit and Flop Movies in 2023) बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्यासह स्टेज शेअर करताना मग शाहरुख म्हणाला… जब तक मैं… आप… और हम जैसे लोक पॉझिटिव्ह हैं… तब तक हम जिंदा हैं… पठाण रिलिज होण्याआधीच शाहरुखचे हे वाक्य हिट झालेले होते. रिलिज अपनी कुर्सी की पेटी बांध लो हा डॉयलॉगही असाच हिट झाला. चित्रपटातील दीपिका पादुकोण आणि शाहरुख यांच्यावर चित्रित… बेशरम रंग… हे गाणेही वादग्रस्त ठरले… (Hit and Flop Movies in 2023)
दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकिनीला आक्षेप घेण्यात आला. मध्य प्रदेशातील इंदूर शहरात तर चित्रपटाचा पहिला शो रद्द करावा लागला. पाटण्यात निदर्शने झाली. अनेक ठिकाणी चित्रपटगृहांबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करावा लागला. पठाणचे पोस्टर्स जाळले गेले, पण पडद्याला तडा गेला नाही. पठाण सुपर हिट झाला. दुबईतील बुर्ज खलिफा इमारतीवरूनही पठाणचे प्रमोशन झाले. जगभरात सिनेमा दणकून चालला. पठाणमुळे शाहरुखचे क्रेझ फार वाढले. पाठोपाठ आलेला शाहरुखचा जवानही त्यामुळे सुपर डुपर हिट झाला. 2023 च्या शेवटाला आलेला डंकी स्पर्धेत प्रभासचा सालार असल्याने तुलनेने काहीसा थंडावलेला असला तरी चालतो आहे.
इस्लामिक कट्टरवादातून काश्मीरमधून हिंदूंना कसे हुसकावून लावण्यात आले, हिंदूंची कशी हत्याकांडे घडली, हे पडद्यावर दाखविणारा द काश्मिर फाईल्स हा लो बजेट चित्रपट हिट ठरला होता. त्यातून प्रेरणा घेऊन द केरला स्टोरी या चित्रपटाची निर्मिती झाली. कथावास्तू वेगळी होती, पण आशय तोच होता. मे महिन्यात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटावरूनही मोठा वाद उद्भवला. हिंदू मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे इस्लाममध्ये मतांतर करणे आणि नंतर तिला इसिस या दहशतवादी संघटनेच्या खाईत लोटणे, सेक्स स्लेव्ह (लैंगिक गुलामीस भाग पाडणे) बनविणे असे या चित्रपटाचे कथानक होते. हा चित्रपट केरळमधील सत्य घटनेवर आधारित असल्याचा निर्माता-दिग्दर्शकांचा दावा होता. किती मुलींबाबत हा प्रकार घडला, तेही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी दिग्दर्शकाने फुगवून सांगितल्याचा आरोप तर झालाच, यासह चित्रपटाची निर्मितीच मुस्लिमांविरुद्ध द्वेषाच्या भावनेतून झाल्याचा ठपका ठेवला गेला. 5 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या दिवशीच मुस्लिम संघटनांनी चेन्नई, कोईम्बतूरसह अनेक ठिकाणी निदर्शने केली.
पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली. तामिळनाडूत काही चित्रपटगृह मालकांनी त्याचे प्रदर्शन थांबवले. चित्रपट निर्मात्यांनी त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने बंगाल सरकारने चित्रपटावर घातलेली बंदी बेकायदा ठरविली. प्रचंड वाद झाल्यानंतरही हा चित्रपटही दी काश्मीर फाईल्सप्रमाणे बॉक्स ऑफिसवर सुपर हिट ठरला. 15 ते 20 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 310 कोटींचा गल्ला गोळा केला. चित्रपटाची नायिका अदा शर्मा हिचा अभिनय कौतुकाचा विषय बनला.
पृथ्वीराज चौहान, लक्ष्मी अशा एकापाठोपाठ फ्लॉपची मालिका देणार्या एकेकाळच्या अक्षय कुमारचा कधीकाळी हिट झालेला ओ माय गॉड त्याला आठवायला लागलेला होता. चला त्याचा दुसरा भाग बनवू म्हणून ओ माय गॉड-2 केला. तो प्रदर्शित झाला आणि वादाला तोंड फुटले. उज्जैनमधील महाकालेश्वर (बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक) मंदिरातील ब्रह्मवृंदाने या चित्रपटाविरुद्ध आवाज उठविला. महाकाल मंदिराचे चित्रण नकोच म्हणून ते सारे चित्रपटातून काढले जावेत, अशी मागणी केली. कोर्टबाजीपर्यंत विषय गेला, पण याचदरम्यान पडद्यावर हाहाकार उडवित असलेला सन्नी देओल याचा गदर-2 (हाही गदर या सन्नीच्या हिट चित्रपटाचा दुसरा भाग) ओ माय गॉड-2 ला आडवा आला. जवानच्या क्रेझचाही विपरित परिणाम झालाच आणि ओ माय गॉड-2 म्हणावा तसा चालला नाही.
बाहुबली-1, बाहुबली-2 हिट झाल्यानंतर प्रभासचा साहो आणि लगोलग आदिपुरुष हे बिग बजेट चित्रपट फ्लॉप झालेले होते. कटप्पाने बाहुबली को क्यो मारा? या संवादासह बाहुबलीच्या दोन्ही भागांनी व्यावसायिक पातळीवर चित्रपट सृष्टीत इतिहास निर्माण केला होता. बाहुबली या अर्थाने पुन्हा जिवंत होईल, अशा हिटची प्रभासलाही गरज होती. घडलेही तसेच… वर्षाचा शेवट प्रभासाठी गोड झाला… डिसेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या प्रभासच्या सालार या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेला आहे. इतका, की याच दरम्यान प्रदर्शित झालेल्या व एका वर्षात दोन बिग हिट अनुभवलेल्या किंग खानच्या डंकीला त्याने मागे टाकले. किंग खानची हॅट्ट्रिक होते, की नाही, असा प्रदर्शनानंतरचा एकुणातील सूर आहे. वास्तविक डंकी हा राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट… खरेतर शाहरुख खानच्या विनंतीवरून खास केलेला चित्रपट. हिरानी यांनी, मुन्नाभाई, थ्री-इडियट, पीके, संजू असे ब्लॉकबस्टर चित्रपट बनविले आहेत. एकही फ्लॉप त्यांच्या नावावर नाही. थ्री-इडियटमध्ये हिरानी शाहरुखला घेणार होते, पण डेट की अशी काही अडचण आली. मग पुढे एकदा शाहरुखच म्हणाला, आमीर, संजय, रणवीरला घेता, अप्रतिम चित्रपट देता… माझ्यावरही मेहेरनजर टाका कि… यातून डंकी तयार झाला… विदाऊट व्हिसा विदेशात जाऊन स्थिरावण्यासाठीचा संघर्ष डंकी या चित्रपटातून आहे…. विषय उत्तम आहे, पण अस्थिर आहे… बॉक्स ऑफिसवरही डंकीची अशीच परिस्थिती आहे. सालार पहिल्या दिवसापासून सैराट आहे!
सालारपूर्वी 1 डिसेंबरलाच प्रदर्शित झालेला संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित अॅनिमल या चित्रपटाने तर अनेक उच्चांक मोडित काढले. चित्रपटातील एका एक शब्द कळत नाही, अशा गाण्याची मोबाईल-मोबाईलवर रिंगटोन बनली. उत्तम अभिनेता असूनही वर्षानुवर्षे एका हिटसाठी तुर्षात असलेल्या बॉबी देओलसाठी हा चित्रपट साक्षात कुबेराचा खजिना ठरला. मोठ्या भावाच्या (सनी-गदर-2) ब्लॉकबस्टरनंतर धाकट्याचेही ब्लॉकब्लस्टर वडील धर्मेंद्र यांनी याचि देही याचि डोळा पाहिले! रणवीर कपूरचेही उदंड कौतुक झाले. चित्रपटातील हिंसक दृश्ये आणि काही संवादांवरून वादही अर्थात झाला.