मराठ्यांचा इतिहास ज्या तलवारी, भाले, ढाली अशा शस्त्रांच्या आधारे लढला, लिहिला गेला. त्या शस्त्रांच्या अभ्यासाचे दालन ज्यांनी सर्वसामान्यांना खुले केले अशा एका संशोधकांचे आज निधन झाले. लढवय्या असणाऱ्या महाराष्ट्राला शिवकालिन शस्त्र कशी होती त्यांचे महत्व काय आहे. अशी शस्त्रे जपली पाहिजेत! या इतिहासाच्या साक्षीदारांची माहिती सर्वसामान्यांनाही झाली पाहिजे या धेय्याने जाधवसरांनी अखंड महाराष्ट्र पालथा घातला. काही संशोधक, शाहीर हे शस्त्रांचे महत्व लोकांना समजू नये म्हणून या विषयाचा साधा उल्लेखही करत नव्हते. त्याच वेळी जाधवसरांनी हा इतिहासाचा महत्वाचा पैलू सर्वसामान्य पर्यंत पोहोचवला. यासाठी त्यांनी या शस्त्रांच्या प्रदर्शनाची निर्मिती केली."इतिहासाचे साक्षीदार" या नावाने हे शिवकालिन शस्त्रांचे दर्शन त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात फिरवले. यातून होणाऱ्या प्रबोधनातून भंगारात जाणारी शस्त्रे वाचली. महाराष्ट्राला या इतिहासाच्या अबोल साक्षीदारांचे महत्व आणि मोल समजले. (Historian Girish Jadhav)
काल (दि.०२) शिवकालीन शस्त्रास्त्र संग्राहक गिरीष लक्ष्मण जाधव (वय ७५) यांचे मंगळवारी जयसिंगपूर येथे निधन झाले. त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. शिवरायांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठीचे जाधव सरांचे मोठे योगदान आहे. जाधव सर आता आपल्यात नाहीत पण त्यांनी केलेल्या कामामुळे आपल्याला ते नेहमी आठवणीत राहतील. दरम्यान, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी त्यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
जाधव सरांचा आणि माझा 1997 साला पासूनचा ऋणानूबंध. आमची भेटच दुर्गरायगडावर झालेली. या भेटीनंतर सरांचे मला पत्र आले त्याला टायटल दिले होते "रायगडावर तीन तोफा सापडल्या". या रायगड भेटीतच जाधवसरांनी आम्हाला कट्यार, वाघनखांसारखी लहान शस्त्रे दाखवली होती.
पूढे भेटी घडत गेल्या सरांच्या प्रेरणेने आम्हीही शस्त्रे जमवत गेलो, पुढे कोल्हापूरला एकदा प्रदर्शन ठरले. या वेळी आम्ही या इतिहासाच्या साक्षीदारांना बोर्डवर लावून घेतले. तिकिट लावून शस्त्र प्रदर्शन भवरले तेही तब्बल दहा दिवस. त्यानंतर ही शस्त्रे वर्ष दोन वर्षे तरी माझ्याकडेच होती. इतका जाधवसरांचा विश्वास आम्ही जिंकला होता. काही वर्षेतर सरांचा फोन आला नाही असा एकही दिवस गेला नव्हता.
आज एक भारी तलवार मिळाली तर कधी खूप दिवस शोधत होतो. तसा गूर्ज मिळाला असे अनेकवेळा सरांची पत्रे, फोन येत. कोल्हापूरला येताना एखादी कट्यार तरी सर घेऊन येत. माझ्याकडे विजयनगरी कट्यार नव्हती तर सरांनी तशी कट्यार मिळवून मला भेट दिली.
दिवाळी पाडव्याला सर हमखास पन्हाळा गडाच्या सज्जाकोठीत आमच्या बरोबर असणारच! तर शिवराज्याभिषेकाला रायगडावर!रायगडावर तर आम्ही कित्येकवेळा रात्रीची चढाई करत होतो. आम्ही रायगडाचा आसमंत तर चार पाच दिवस एकत्र राहून पालथा घातलाय.
माझ्या अभ्यासिकेत तर कित्येक रात्री इतिहासावर चर्चा करत जागून काढल्यात! अशा अनेक आठवणींचे मोहळ आज उठलेय… जाधव सरांनी शिवकालिन शस्त्रे या विषयावर पुस्तक लिहावे म्हणून आम्ही विनंती करत होतो. काही महिन्यांपूर्वी त्यांचे हार्टचे आॕपरेशन झाले. त्यातून बरे झाल्यावर त्यांचा फोन झाला! मला नेहमी प्रमाणे फोनवरुन लवकरच पुस्तक लिहून पूर्ण करतो असे आश्वासन दिले पण…
आज गिरीष लक्ष्मण जाधव या व्यक्तीच्या जाण्याने माझे तर भरुन न येणारे नूकसान झाले आहेच. पण आज महाराष्ट्रही इतिहास क्षेत्रात तलवारी, भाले, कट्यार, विटा, पट्टे अशा शस्त्रांनाही महत्व आहे, यांचाही अभ्यास करता येतो असे दाखवून देणाऱ्या एका एका लढावू अभ्यासकाला, संशोधकाला पोरका झाला आहे.
इंद्रजित सावंत, कोल्हापूर