Latest

हिंगोली : कार अपघातात पोलिस उपनिरीक्षक ठार, दोघे जण जखमी

निलेश पोतदार

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा कळमनुरी ते आखाडा बाळापूर मार्गावर कारच्या अपघातात पोलिस उपनिरीक्षक ठार तर दोघे जण जखमी झाल्याची घटना घडली. ही घटना काल (शनिवार) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. निळकंठ लक्ष्मण दंडगे (वय ५०) असे मृत पोलिस उपनिरीक्षकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हिंगोली जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेले निळकंठ दंडगे हे मागील दोन वर्षांपूर्वीच खात्यांतर्गत परिक्षा देऊन पोलिस उपनिरीक्षक झाले होते. सध्या ते नागपूर शहर पोलिस ठाण्यात कार्यरत होते. दरम्यान, शनिवारी सायंकाळी ते मित्रासोबत आखाडा बाळापूरकडून कारने हिंगोलीकडे येत असतांना त्यांच्या कारचा अपघात झाला. यामध्ये कारमध्ये असलेले उपनिरीक्षक दंडगे व त्यांचे मित्र गजानन प्रभाकर राठोड, शिवाजी माधव गायकवाड हे तिघेही कारच्या बाहेर फेकले गेले. रात्रीच्या वेळी झालेल्या या अपघाताची माहिती कळमनुरी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस उपाधिक्षक प्रशांत देशपांडे, कळमनुरीचे पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक रेखा शहारे, जमादार दिलीप पोले, देविदास सुर्यवंशी, गजानन होळकर यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी तिघांनाही उपचारासाठी कळमनुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपनिरीक्षक दंडगे यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जाहिर केले. तर शिवाजी गायकवाड व गजानन राठोड यांच्यावर उपचार केले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, मृत दंडगे हे औंढा नागनाथ तालुक्यातील जामगव्हाण गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या पश्‍चात आई, वडिल, पत्नी, दोन मुले असा परिवार असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT