Latest

Himachal Rain Alert : हिमाचलमध्ये परिस्थिती नियंत्रणात; मात्र पुढचे २ दिवस अति मुसळधारेचा इशारा

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: गेल्या काही दिवसांपासून हिमाचलमध्ये अतिवृष्टी सुरू आहे. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलन आणि दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. अजूनही हिमाचल प्रदेशातील अनेक ठिकाणी शोध मोहीम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सध्या हिमाचलमधील परिस्थिती नियंत्रणात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी दिली आहे. मात्र शिमला हवामान विभागाने हिमाचल प्रदेशात पुढचे ४८ तास पुन्हा अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे येथील परिस्थिती आणखी गंभीर (Himachal Rain Alert) होण्याची शक्यता आहे, असे वृत्त 'एनडीटीव्ही इंडिया'ने दिले आहे.

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू म्हणाले की, १३ ते १६ ऑगस्टदरम्यान हिमाचलमध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे या कालावधीत दरड कोसळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या. भूस्खलनामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात जीवीत आणि वित्तीय हानी झाली आहे. मात्र, सध्या राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे, असे मुख्यमंत्री सुखविंदर यांनी स्पष्ट केले आहे. याच नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेश सरकारने केंद्र सरकारला ही 'आपत्ती' 'राष्ट्रीय आपत्ती' म्हणून घोषित करण्याची विनंती केली आहे. तसेच हिमाचल प्रदेशात गेल्या ५० वर्षातील सर्वात विनाशकारी स्थिती (Himachal Rain Alert) निर्माण झाली असल्याचे हिमाचल सरकारने म्हटले आहे.

Himachal Rain Alert-संकट अजून टळले नाही; पुढचे २ दिवस पुन्हा अति मुसळधार

हिमाचलमधील स्थानिक हवामान विभागाने दिलेल्या बुलेटीननुसार, आज (दि.२०) आणि सोमवारी (२१ ऑगस्ट) मुसळधार ते अति मुसळधार पावसासाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे, तर 22 आणि 23 ऑगस्टला मुसळधार पावसासाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे. अतिवृष्टीमुळे भूस्खलन, अचानक पूर येण्याची आणि नद्या-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे हिमाचलमध्ये पिकांचेही नुकसान होऊ शकते, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

पावसाळा सुरू झाल्यापासून ३३८ जणांचा मृत्यू

राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्रानुसार, हिमाचल प्रदेशमध्ये २४ जूनपासून पावसाळा सुरू झाला. दरम्यान मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत आणि रस्ते अपघातांमध्ये आत्तापर्यंत ३३८ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि ३८ बेपत्ता आहेत. आपत्कालीन केंद्राकडून सांगण्यात आले की, पावसामुळे हिमाचलमधील ११ हजार ६०० घरांचे पूर्ण किंवा अंशत: नुकसान झाले आहे आणि सुमारे ५६० रस्ते अजूनही ब्लॉक आहेत. त्याचबरोबर २५३ ट्रान्सफॉर्मर आणि १०७ पाणीपुरवठा योजनांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे.

भाजप अध्यक्ष जे.पी नड्डा हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा आज (दि.२०) हिमाचल प्रदेशात नुकत्याच आलेल्या पूर आणि भूस्खलनामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी हिमाचल प्रदेशात पोहोचले आहेत. हिमाचल प्रदेशात अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या ठिकाणांना ते आज भेट देणार आहेत. दरम्यान माध्यमांशी बोलताना नड्डा म्हणाले, या आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल मला दु:ख झाले आहे. सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. तसेच स्थलांतरितांना आवश्यक ती मदतही पुरवली जात आहे, असे नड्डा यांनी म्हटले आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT