Latest

महाराष्ट्रात तापमानात वाढ, गहू पिकाचे नुकसान होऊ शकते, IMD कडून शेतकऱ्यांसाठी ॲडव्हायजरी जारी

दीपक दि. भांदिगरे

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : गहू उत्पादक राज्यांत तापमानात सामान्यपेक्षा ३-५ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. याचा फटका गहू पिकाला (wheat crop) बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) शेतकर्‍यांना एक ॲडव्हायजरी जारी करत त्यांना अचानक वाढलेल्या तापमानाच्या परिणामाबद्दल सावध केले आहे. "दिवसा वाढलेल्या तापमानाचा गव्हावर विपरीत परिणाम होऊ शकतो. कारण गहू पीक पुनरुत्पादक वाढीचा कालावधी जवळ येत आहे, जो तापमानास संवेदनशील मानला जातो," असे IMD ने एका निवेदनात म्हटले आहे.

"पीक फुलोरा अवस्थेत असताना आणि ते परिपक्व होण्याच्या काळात तापमान वाढले तर उत्पादनात घट होते. इतर पिके आणि बागायतींवरही असाच परिणाम होऊ शकतो." असे हवामान विभागाने नमूद केले आहे. गुजरात आणि महाराष्ट्र या प्रमुख गहू उत्पादक राज्यांमध्ये कमाल तापमान ३५-३९ अंश सेल्सिअसवर गेले आहे. वायव्य, मध्य आणि पश्चिम भारतामध्ये तापमान सामान्यपेक्षा ३-५ अंश सेल्सिअसने वाढले आहे. या ठिकाणी गहू हे प्रमुख रब्बी पीक आहे. यामुळे वाढत्या तापमानाचा गहू पिकावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.

भारत हा गहू उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी गहू उत्पादक राज्यांमध्ये तापमानात अशीच वाढ झाली होती. यामुळे गव्हाचे उत्पादन २०२१ मध्ये १०९.५९ दशलक्ष टनावरून १०६.८४ दशलक्ष टनांपर्यंत खाली आले. हे उत्पादन घटल्याने त्याच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती. यामुळे गव्हाच्या खासगी खरेदीत वाढ झाली आणि सरकारी खरेदीत लक्षणीय घट झाली. परिणामी जानेवारीमध्ये गव्ह्याच्या किमती वाढल्या. या दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारला गहू खुल्या बाजारात, गिरणी आणि इतर व्यापाऱ्यांना विकावा लागला.

फेब्रुवारीमध्ये तापमानात असामान्य वाढ झाली आहे. गुजरात, महाराष्ट्र आणि गोव्यातील काही भागांत उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

पिकाला हलक्या स्वरुपात पाणी द्या

"तापमान वाढल्याच्या परिस्थितीत पिकांना हलक्या स्वरुपात पाणी दिले जाऊ शकते. उच्च तापमानाचा प्रभाव कमी करण्यासाठी भाजीपाला पिकांच्या दोन सरींमधील जागेत आच्छादन सामग्रीचा वापर करावा जेणेकरुन मातीचा ओलावा टिकून राहील," असे हवामान विभागाने शेतकऱ्यांसाठी जारी केलेल्या ॲडव्हायजरीमध्ये म्हटले आहे. गव्हाव्यतिरिक्त उच्च तापमानाचा इतर पिके आणि बागायती पिकांवर देखील विपरित परिणाम होऊ शकतो, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT