Latest

व्यास तळघरात पूजा सुरूच राहील; उच्च न्यायालयाचा आदेश

दिनेश चोरगे

वाराणसी; वृत्तसंस्था : वाराणसीतील ज्ञानवापी संकुलातील व्यास तळघरातील देवतांची पूजा हिंदूंकडून सुरूच राहणार आहे. या पूजेला हरकत घेणारा मुस्लिम पक्षाचा अर्ज अलाहाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावला.

वाराणसी जिल्हा न्यायालयाने हिंदूंना व्यास तळघरात पूजा करण्याचा अधिकार असल्याचा आदेश यापूर्वी दिला होता. त्यानुसार 31 जानेवारी रोजी रात्री व्यास तळघरात शिव, गणेश आदी देवतांची पूर्ववत पूजा सुरू झाली होती. ती आजतागायत सुरू आहे. मुस्लिम पक्ष म्हणजेच अंजुमन इंतेजामिया मशीद समितीने व्यास तळघरातील या पूजेला हरकत घेणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. व्यास तळघर बर्‍याच काळापासून आमच्या अखत्यारीत आहे. ते ज्ञानवापी मशिदीचाच एक भाग आहे, असा मुस्लिम पक्षाचा युक्तिवाद होता. न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांनी तो अमान्य केला आहे. खरे तर वाराणसी न्यायालयाच्या निकालानंतर मुस्लिम पक्ष त्याविरोधात थेट सर्वोच्च न्यायालयात गेला होता. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर सुनावणीस नकार दिला आणि मुस्लिम पक्षाने आधी उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी, अशी सूचना केली होती.

31 वर्षे बंद होते तळघर

व्यास तळघर 31 वर्षांपासून बंद होते. तळघरात 1993 पासून पूजा करण्यास बंदी होती. व्यास कुटुंब ब्रिटिश राजवटीपासून तळघरात पूजा करत होते. याच कुटुंबातील शैलेंद्र कुमार व्यास यांना परंपरेने तो हक्क आहे, असे न्यायालयाने आपल्या निकालात आधीच स्पष्ट केलेले आहे. व्यास तळघरासमोरच नंदीची मूर्ती आहे, हे येथे उल्लेखनीय!

SCROLL FOR NEXT