Latest

राज्य सरकारी कर्मचार्‍यांना कार्यालयात जाताना हेल्मेटसक्ती

Arun Patil

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : अनेकदा जनजागृती करूनही सर्वसामान्य नागरिक हेल्मेट वापरताना दिसत नाहीत. एवढेच नाही तर सरकारी कर्मचारीही हेल्मेट न वापरताच दुचाकीवरून कार्यालयात येतात. त्यामुळे परिवहन विभागाने आता सरकारी कर्मचार्‍यांनी कार्यालयात येताना हेल्मेट घातले नाही तर संबंधित कार्यालयातील विभागप्रमुखांवर दंड आकारला जाईल, असे परिपत्रकच काढले आहे.

परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी राज्यातल्या 50 आरटीओ कार्यालयांना हेल्मेट वापराबाबतच्या मार्गदर्शक सूचना पाठवल्या आहेत. त्यानुसार सर्व कार्यालयांनी मोटार वाहन नियम 154 सी ची काटेकोर अमंलबजावणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

सरकारी कर्मचार्‍यांनी कार्यालयात दुचाकीवर येताना हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. हा नियम पाळणार नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

सरकारी कार्यालयांनंतर हा नियम खासगी आस्थापनांनाही लागू करण्यात येणार असल्याचेही भिमनवार यांनी सांगितले आहे. या नियमामुळे हेल्मेट वापरणार्‍यांची संख्या वाढेल आणि दुचाकी वाहनांचा अपघात झाल्यानंतर होणार्‍या मृत्यूंची संख्या कमी होईल.

गाडी चालवताना सुरक्षा साधने न वापरणार्‍या नागरिकांना 1000 रुपये दंड आणि चालक परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याची सेक्शन 194 सी मध्ये तरतुद आहे. परंतु, प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने हेल्मेट न वापरण्याकडे लोकांचा कल आहे.

सरकारी कर्मचारी संघटनेची भूमिका

यासंदर्भात बोलताना राज्य मध्यवर्ती सरकारी कर्मचारी संघटनेचे प्रवक्ते सुरेंद सरतापे म्हणाले की, लोकांनी हेल्मेट वापरणे गरजे आहे. त्यासाठी सतत प्रबोधन करण्याच्या मोहिमा परिवहन विभाग आणि पोलिसांनी घ्यायला हव्यात. मात्र फक्त सरकारी कार्यालयातील कर्मचार्‍यांवर कारवाई केली तर त्यातून एक टक्कयापेक्षाही जास्त हेल्मेट वापरणार्‍यांची संख्या वाढणार नाही. ही मोहीम राबवली जाणार असली तरी कर्मचार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी परिवहन विभागाकडे तेवढे कर्मचारी नाहीत. हेल्मेट न वापरणारा कर्मचारी सापडल्यानंतर नोटीस पाठवणे, दंड वसूल करणे, इतर कायदेशीर प्रक्रिया राबवणे यासाठी आवश्यक कर्मचारी नाहीत. त्यामुळे या मोहिमेचा अपेक्षित फायदा होणार नाही.

भरारी पथकाद्वारे लक्ष

यासंदर्भात दै. 'पुढारी'शी बोलताना परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी सांगितले, हेल्मेटचा वापर सरकारी कार्यालयात येताना कर्मचारी करतात की नाही यावर आमच्या भरारी पथकाद्वारे बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच सरकारी कार्यालयाच्या पार्किंग लॉटमध्ये असणार्‍या सीसीटीव्हीचे फुटेज सरप्राईज व्हिजिटमध्ये भरारी पथक तपासेल. त्यानुसार कर्मचारी दुचाकीवरून येताना हेल्मेट घालून आल्याचे दिसले नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधित कर्मचार्‍याच्या विभाग प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT