Latest

भोसरी : दुसर्‍या दिवशीही पावसाने झोडपले

अमृता चौगुले

भोसरी : मागील काही दिवसांपासून पाऊस थांबला होता. दुपारच्या वेळेस परिसरात प्रचंड उकाडा जाणवत होता. पण वातावरणात बदल झाल्याने पुन्हा पावसाने भोसरी व परिसरात जोरदार हजेरी लावली. परिसरातील नागरिकांना सलग दुसर्‍या दिवशीही परतीचा पावसाचा फटका सोसावा लागला.

राज्यातील मान्सून सध्या परतीच्या मार्गावर आहे. पण, जाता-जाता पाऊस परत परिसरात झोडपण्याची शक्यता आहे. सलग दुसर्‍या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने परिसरात काही प्रमाणात गारवा निर्माण झाला होता. सोमवारी कोसळलेल्या पावसामुळे मंगळवारी सकाळपासून प्रचंड उकाडा जाणवत होता. मंगळवारी दुपार पासूण पावसाने पुन्हा भोसरी, दिघी, इंद्रयाणीनगर परिसर झोडपून काढला. पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते.

भोसरी, इंद्रायणीनगर, चक्रपाणी वसाहत, आळंदी रोड, दिघी परिसरात पावसाचा जोर कायम होता. परिसरातील रस्त्यावर दुपारनंतर रस्ते ओस पडले होते. सायंकाळी पडणार्‍या पावसात चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. पालिका प्रशासनाने नागरिकांचे हित लक्षात घेता तातडीने उपाययोजना करण्याची मागणी तसेच नियमित साचणार्‍या पावसाचा पाण्याचा समस्येतून सुटका करण्याची मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.

परिसरातील अनेक मुख्य रस्त्यावर तसेच सेवा रस्त्यावर पाण्याची डबकी तयार झाली होती. त्याचबरोबर प्रभागातील गल्लीतील रस्त्याचीदेखील अवस्था वेगळी नव्हती. परिसरातून ये जा करताना नागरिकांना कसरत करावी लागत होती. अनेक ठिकाणी रस्ते चिखलमय झाले होते. अचानक हवामानात बद्दल झाल्याने थंडी व तापाचे रुग्णदेखील परिसरात वाढले असल्याचे चित्र आहे.

SCROLL FOR NEXT