Latest

गोंदियात केमिकल कंपनीला भीषण आग; जीवितहानी नाही

निलेश पोतदार

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा या शहरातील फुलचुर नाका परिसरात एका केमिकल कंपनीत भीषण आग लागल्याची घटना आज (शुक्रवार) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गोंदिया-गोरेगाव मार्गावर फुलचुर टोलनाका परिसरात गोंदियातील अविनाश बजाज यांच्या मालकीची ही केमिकल कंपनी आहे. या ठिकाणी फर्निचर करिता वापरण्यात येणारे केमिकल, पॉलीश आदी साहित्य असल्याचे त्यांनी 'पुढारीʼ शी बोलताना सांगितले. तर शॉटसर्किटमुळे ही आग लागली असावी अशी शक्यता त्यांनी यावेळी व्यक्त केली. बजाज यांच्या मते यात त्यांचे जवळपास ५० लाख रुपयांहून अधिकचे नुकसान झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

सकाळी काही लोकांना कंपनीतून आगीचे लोट बाहेर येताना दिसले. याची माहिती त्यांनी बजाज यांना दिली. त्यांनी कंपनीकडे धाव घेत नागरिकांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. त्यामुळे आग विझविण्याच्या प्रयत्नात एक युवकही किरकोळ भाजल्याची माहिती पुढे येत आहे. दरम्यान, घटनेची माहिती अग्निशमन पथकाला देण्यात आली. अग्निशमन दलाचे चार बंब व पोलीस पथक घटनास्थळावर दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. तर सकाळी ११ वाजतापर्यंत सुमारे ८० टक्के आग विझविण्यात पथकाला यश आले होते.

मोठा अनर्थ टळला

आग लागलेल्या कंपनीच्या शेजारीच खासगी मोकळ्या जागेत वीज वितरण कंपनीचे रोहित्र व इतर साहित्य ठेवण्यात आले आहे. आग आटोक्यात आल्याने हे साहित्य विशेषतः रोहित्र थोडक्यात बचावले. अन्यथा मोठा स्फोट होऊन अनर्थ घडला असता अशा चर्चा घटनास्थळावर उपस्थित लोकांमध्ये सुरू होत्या.

अग्निशमन दिनाच्या दिवशीच घडली घटना

४ मे सर्वत्र आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. योगायोगाने आजच्याच दिवशी ही घटना घडली. यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले असताना इमारतीलाही नुकसान पोहोचले आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT