Latest

ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावर उद्या हायकोर्टात सुनावणी

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अंधेरी-पूर्व विधानसभा पोटनिवडणूक लढवण्यासाठी ऋतुजा लटके यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊनही तो मंजूर होत नसल्याने कोर्टात धाव घेतली आहे. याबाबतची सुनावणी उद्या मुंबई हायकोर्टात होणार असून उद्या निर्णय होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. सध्या या प्रकरणाकडे राजकीय खेळीचा भाग म्हणून पहिले जात असल्याने उद्याच्या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

याबाबत आधी माहिती अशी, आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेच्या अंधेरी पूर्व विभागात कार्यरत आहेत. ऋतुजा लटके यांना अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारी देण्याचे 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' या पक्षाकडून निश्चित झाले आहे; पण त्यांचा अर्ज निवडणूक रिंगणातून बाहेर काढण्यासाठी किंवा त्यांना शिंदे गटात खेचण्यासाठी त्यांचा राजीनामा स्वीकारला जात नाही. असा आरोप शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

यावेळी ते म्हणाले की, रमेश लटकेंना न्याय देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने ऋतुजा लटके यांची उमेदवारी जाहीर केली होती. पण त्यांचा अर्ज निवडणूक रिंगणातून बाहेर काढण्यासाठी, तसेच त्यांना शिंदे गटात खेचण्यासाठी त्यांचा राजीनामा स्वीकारला जात नाही. २ सप्टेंबरला त्यांनी राजीनामा दिला होता. एक महिन्यानंतर राजीनामा आणण्यासाठी गेल्यानंतर राजीनामा चुकीचा असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी ३ ऑक्टोबरला पुन्हा राजीनामा दिला आहे. १ महिना आधी नोटीस दिली असातानाही राजीनामा मंजूर करू नये यासाठी असलेल्या दबावामुळे आयुक्त राजीनामा मंजूर करत नाहीत. शिंदे गटाकडून हा दबाल टाकला जात असून लटके यांनाही मंत्रीपदाची ऑफर दिली जात आहे. पण लटके कुटुंब शिवसेनेशी एकनिष्ठ आहे. ते कोणत्याही आमिषाला किंवा दबावाला बळी पडणार नसल्याचे परब यांनी म्हटले आहे. राजीनामा का मंजूर केला जात नाही, याबाबत आयुक्तांकडे लेखी कारण मागितले आहे. पण त्यांच्याकडूनही कारण दिले जात नाही. अर्ज भरण्यासाठी २ दिवस शिल्लक असल्याने याप्रकरणी कोर्टाकडे दाद मागितली आहे.

SCROLL FOR NEXT