Latest

तीन वर्षे… बारा-बारा तास अभ्यास… फरहान जिंकलाच!

दिनेश चोरगे

सांगली :

'खुदी को कर बुलंद इतना,
की तकदीर लिखनें से पहेले
खुदा खुद बंदे से पुछे,
की बोल तेरी रजा क्या है..?'

पंचवीस वर्षांच्या फरहान इरफान जमादारनं स्वत:ला इतकं बुलंद केलं की, त्याच्या या मेहनतीला चार चाँद लागले. मेहनत रंग लायी. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत देशात 191 वा क्रमांक पटकावत तो आयएएस उत्तीर्ण झाला आणि आपलं नाव देशात रोशन केलं. त्याच्याशी केलेली ही बातचीत…

प्रश्न : या परीक्षेकडे कसा वळला?

फरहान : सांगलीतील वालचंद इंजिनिअरिंग महाविद्यालात कॉम्प्युटर सायन्स शिकत असताना एकदिवस सेमीनारला गेलो. आमच्याच कॉलेजच्या आयएएस झालेल्या दोन माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन ऐकायला मिळाले. त्यावेळी मला आयएएसबाबत माहिती मिळाली. त्यांचे मनोगत ऐकल्यानंतर समाजासाठी काम करण्याचा वेगळा विचार मनात आला. यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवले. त्यानुसार यूपीएससीची परीक्षा देण्याची तयारी सुरू केली.

 प्रश्न : कोणत्या गोष्टी प्रेरणादायी ठरल्या?

फरहान : आयएएसचे दोन प्रयत्न अयशस्वी झाले. तिसर्‍यावेळी पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालो. त्याने आत्मविश्वास वाढला. पण, आर्थिक अडचण कायम होती. काहीजणांनी मदत केल्यामुळे दिल्लीला जाऊन तयारी केली. माझ्या यशात आई-वडील, भाऊ फरदीन आदींचा मोठा वाटा आहे. 'ट्वेल्थ फेल' चित्रपटानेही माझ्यावर परिणाम केला. यातील जिद्द, चिकाटी आणि समर्पण या नायकावर परिणाम केलेल्या तीन शब्दांपासून मी प्रेरणा घेतली. आयएएसच्या अर्धा तासाहून अधिक चाललेल्या मुलाखतीवेळीही या चित्रपटावर मला प्रश्न विचारण्यात आला. तेव्हाही मी या तीन शब्दांपासून प्रेरणा घेतल्याचे सांगितले. माझ्या श्वानप्रेमाबद्दल तसेच सुमारे 50 हून प्रश्न मला विचारण्यात आले.

प्रश्न : अभ्यास कसा केला?

गेली तीन वर्षे रोजचा आठ ते बारा तास अभ्यास केला. पदवीच्या अंतिम वर्षात असताना आयआयटी आणि माझ्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांना मिळालेली मोठी पॅकेज दिसत होती. या कामात पैसा भरपूर मिळतो. पण, सन्मान, समाजासाठी काम केल्याचा आनंद मिळेलच असे नाही. तळागाळातील लोकांसाठी काम करण्यासाठीही आयएएस हे उत्तम माध्यम आहे. युट्यूब, वर्तमानपत्रे, संदर्भाची पुस्तके वाचत राहिलो. प्री आयएएस ट्रेनिंग सेंटरच्या संचालकांनी विद्यावेतनाची सोय केली. दिल्लीला जाण्यासाठी ताकद दिली. दोनवेळा अपयश आल्यानंतर अभ्यास बंद करून पुण्यात आयटीमध्ये नोकरी शोधण्यास प्रारंभ केला. यावेळी काही मित्रांनी, आयएएसची परीक्षा सहा महिन्यांवर असून अभ्यास सोडू नको, असा सल्ला दिला. त्यामुळे पुन्हा एकदा जोमाने तयारी सुरू केली. मुख्य परीक्षेतील यशानंतर मुलाखतीच्या तयारीसाठी दिल्ली गाठली. मुलाखत छान झाल्याने यशाची अपेक्षा वाढली.

प्रश्न : आता पुढील प्राधान्यक्रम काय असणार आहे?

फरहान : आई-वडिलांच्या चेहर्‍यावर दिसलेला आनंद माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. पाहिलेले स्वप्न साकारण्यावर भर देणार आहे. जास्तीत जास्त लोकसेवा आणि समाजसेवेवर भर देणार आहे. समाजासाठी देणे असलेली सेवा देणार आहे. आयएएस परीक्षेबाबतही तरुणांमध्ये जागृती करणार आहे.

हारा वही, जो लढा नही
सर्वात प्रथम आपण आपली क्षमता ओळखायला हवी. दोन प्रयत्नात आपण योग्य आहोत का, हेही पाहिले पाहिजे. अपयश येत असेल तर हे मान्य करून त्यातून बाहेर पडले पाहिजे. जीवनात अनेक वाटा आहेत. त्यातील आवडीच्या क्षेत्रात आपण करियर करायला हवे. जीवन हे पाण्यासारखे आहे. नेहमी वाहत राहिले पाहिजे. निराशपणे कोठे थांबायचे नाही. ' हारा वही, जो लढा नही…'
– फरहान जमादार

छोटे, मेहनती कुटुंब

फरहानचे वडील इरफान यांचा छपाई आणि बुक बाईंडरचा छोटासा व्यवसाय आहे. ते कोल्हापूरमध्ये राहतात. वडिलांनी फरहानच्या शिक्षणासाठी खूपच कसरत केली. मात्र काही कमी पडू दिले नाही. दहावीत 92 टक्के गुण मिळविल्याने त्यांना फरहानबाबत आत्मविश्वास होता. सरकारी नोकरी मिळेल, अशी अपेक्षा त्यांची होती. आई शमीम या गृहिणी आहेत, तर भाऊ फरदिन इंजिनिअरिंग करीत आहे. फरहान देश, समाजासाठी नक्कीच चांगली सेवा देईल, अशी अपेक्षा ते व्यक्त करतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT