कोल्हापूर ः 'चला हवा येऊ द्या' या टीव्हीवरील कार्यक्रमामुळे महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेले डॉ. नीलेश साबळे आता कलर्स वाहिनीवरील 'हसताय ना? हसायलाच पाहिजे' या नव्या कोर्या विनोदी कार्यक्रमासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. शनिवार, दि. 27 एप्रिल रोजी या कार्यक्रमाचा पहिला भाग प्रसारित होत आहे. या निमित्ताने डॉ. नीलेश साबळे आणि 'चला हवा येऊ द्या' फेम विनोदवीर भाऊ कदम यांनी गुरुवारी दै. 'पुढारी' कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांच्याशी या नवीन कार्यक्रमाबाबत वार्तालाप केला.
1000 एपिसोड पूर्ण झालेला 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम नुकताच थांबवण्यात आला. त्यामुळे भाऊ कदम, ओंकार भोजने, सूपर्णा श्याम, स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण आदी कलाकारांना घेऊन हा कार्यक्रम डॉ. नीलेश साबळे घेऊन येत आहेत.
साबळे म्हणाले, या कार्यक्रमात अरविंद जगताप, रोहित जाधव असे गुणी लेखक प्रहसनं आणि प्रसंग लिहितील. केवळ विनोदच नाही तर हसता हसता अंतर्मुख व्हायला लावणारे सामाजिक संदेश या कार्यक्रमात असतील. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खास कौटुंबिक पात्रांचा समावेश असलेली एक थीम आहे. त्यात नीलेश साबळे, विजय साबळे हे पात्र साकारतात. भाऊ कदम त्यांच्या मेव्हण्यांची भूमिका करत असून, दर एपिसोडला भाऊजींकडून पैसे घेऊन वेगवेगळा व्यवसाय करणारे धम्माल पात्र भाऊ कदम साकारत आहेत.
सोशल मीडिया, रील्सच्या जमान्यात प्रेक्षकांना ठरावीक वेळेत एक तासासाठी टीव्हीच्या पडद्यापुढे खेचून आणणे हे मोठे चॅलेंज आहे. सोशल मीडियावरील विनोदवीरांना आमच्या कार्यक्रमात संधी देणारा 'आम्ही रील्सकर' हा सेग्मेंट असेल. लोकांना आपले रील्स कलर्स मराठीकडे पाठवायचे आहेत. त्यातून विजयी रील्सला कार्यक्रमात दाखवण्यात येईल. तसेच खास बक्षीसही देण्यात येईल. या रील्सचे परीक्षण कार्यक्रमाचे सेलिब्रिटी पाहुणे, प्रसिद्ध विनोदी अभिनेते भरत जाधव, आणि ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल करणार आहेत, असे डॉ. साबळे यांनी सांगितले. यावेळी कलर्स मराठीच्या जनसंपर्क अधिकारी सुगंधा लोणीकर उपस्थित होत्या.
नवीन पिढी रिल्सवर आणि मोबाईल्समध्ये गुंग असली तरी ज्येष्ठांना मनोरंजनासाठी टीव्ही हाच पर्याय असतो. ते आवर्जून विनोदी कार्यक्रमाची वाट पाहतात. कुठे भेटले तर ते ओळखून दाद देतात. हा फार खोडकर आहे असे म्हणतात. ही आमच्या कामाची पावती आहे, असे भाऊ कदम यांनी यावेळी सांगितले.