Latest

 कोल्हापूर : गतहंगामातील 400 रु. देणे शक्य नाही : हसन मुश्रीफ

Arun Patil
कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गेल्या हंगामातील 400 रुपये देणे शक्य नाही.  यावर्षी जर कोणी कमी देत असेल तर ते वाढवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगत ऊस दरावरून विनाकारण संघर्षाचे वातावरण निर्माण करू नका, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी केले. जिल्ह्यात सुरू असलेल्या ऊस दर आंदोलनाबाबत पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट करत याबाबत राजू शेट्टी, सतेज पाटील, विनय कोरे यांच्याशी संवाद सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
एकरकमी एफआरपीची मागणी होती, त्यावरून फॉर्म्युला ठरला. तशीच एफआरपी दिली जाते. त्यासाठी कारखान्यांना कर्ज काढावे लागते. अनेक कारखान्यांच्या किमतीएवढे कर्ज झाले आहे. आता हा फार्म्युला कसा बदलता येईल. अन्य जिल्ह्याप्रमाणे तीन टप्प्यात एफआरपी देत असतो, तर शेतकर्‍यांना अजून शंभर रुपये देणे शक्य झाले असते, असेही त्यांनी सांगितले.
माझ्या कारखान्याची साखर विका म्हणून राजू शेट्टी यांना विनंती केली आहे. पण त्यांनी ती मान्य केलेली नाही. सगळं सोंग करता येतं पण पैशाचं सोंग करता येत नाही, असे सांगत ते म्हणाले, अन्य जिल्ह्यात हंगाम सुरू आहे. मग कोल्हापुरात वेगळा न्याय का, असा सवालही त्यांनी केला. राजू शेट्टी यांच्यासारखे नेते पाहिजे, नाहीतर कारखानदार वळणावर येणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आम्ही महायुतीसोबत इमाने इतबारे  असू, असे सांगत अजित पवार नाटक करणारे नेते नाहीत, त्यांचे आत एक आणि बाहेर एक असे नसते, असा टोलाही त्यांनी लगावला. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे हे छगन भुजबळ यांचे देखील मत आहे. जातीनिहाय जनगणनेची मागणी होत आहे. ती झाली तर 'दूध का दूध पानी का पानी' होईल, असेही त्यांनी सांगितले.
झोमॅटो, स्वीगी यांच्यासारखा आमचा सेल आहे. प्रतिज्ञापत्र खरे की खोटे ठरवण्याचा अधिकार नेत्याला नाही, तो निवडणूक आयोगाला आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचा असून चिन्ह देखील आमच्याकडेच राहील, असेही त्यांनी सांगितले.
गाय दुधाला गोकुळचा सर्वात जास्त दर
गायीच्या दुधाला राज्यात सगळ्यात जास्त दर गोकुळ देत आहे. संस्थेचा तोटा होत गेला तर भविष्यात काय होईल, हे लक्षात घ्यावे. तोट्याची माहिती घ्यावी, असे सांगत शिवसेनेच्या नेत्यांना मी समजवून सांगेन, असेही मुश्रीफ यांनी  सांगितले.
SCROLL FOR NEXT