Latest

सांगली : ‘हर घर… ना नल, ना जल’

दिनेश चोरगे

सांगली : 'जलजीवन मिशन' योजनेअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबास 2024 पर्यत प्रतिदिनी प्रतिव्यक्ती 55 लिटरप्रमाणे पाणी देण्याचे नियोजन शासनाकडून केले होते, मात्र मे महिना मध्यावर आला तरी जिल्ह्यात केवळ 176 गावात 227 योजना पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे दिलेले आश्वासन पाण्यात बुडाल्याची भावना व्यक्त होत आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी कामाची झाडाझडती घेऊन दोषी असणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

केेंद्र शासनाच्यावतीने 'हर घल नल, हर घर जल' या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील वाड्या, वस्त्यांवरील 4 लाख 57 हजार 879 कुटुंबांतील ग्रामस्थांना शुद्ध, नियमित, पुरशा स्वरुपात थेट नळाद्वारे पिण्याचे पाणी देण्यासाठी 2019 मध्ये मोठा गाजावाजा करीत 'जलजीवन मिशन' या योजनेचा प्रारंभ केला. त्यानुसार जिल्ह्यात 635 गावांत 683 ठिकाणी योजनेला मंजुरी देण्यात आली. त्यासाठी सुमारे 792 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक केले. सर्व कामांना प्रशासकीय मान्यता देऊन टेंडर काढले आहे. या योजनेचा मोठा गाजावाजा झाला. मात्र आतापर्यंत जिल्ह्यात 377 कोटी म्हणजेच सुमारे 47.65 टक्के रुपये खर्च झाले. केवळ 176 गावात 227 ठिकाणी योजना पूर्ण झाल्या आहेत. अद्यापही 456 योजनेचे काम सुरू आहे.

जत पिछाडीवर; पलूस आघाडीवर

जत तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच 102 योजनेला मंजूर मिळाली आहे. परंतु, या तालुक्यात केवळ 21 योजना पूर्ण आहेत. अजूनही 81 योजनेचे काम सुरूच आहे. कडेगाव तालुक्यात 55 योजनेपैकी केवळ 8 योजना पूर्ण आहेत. पलूस तालुक्यात 32 योजना मंजूर आहेत. त्यापैकी 20 ठिकाणचे काम पूर्ण आहे. या तालुक्यात काम गतीने सुरू आहे.

दंड केला; रिझर्ल्ट काय

या योजनेअंतर्गत सुरू असणारी कामे अनेक गावात अपूर्ण आहेत. अपूर्ण काम ठेवणार्‍या सुमारे 100 कंत्राटदारांना जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून सुमारे 10 लाखांचा दंड केला आहे. मात्र दंड करून रिझर्ल्ट काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कामचुकारपणा करणार्‍या ठेकेदारांवर कारवाईची मागणी होत आहे.

पालकमंत्री काय भूमिका घेणार ?

कामाची गती संथ असल्याने पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी जिल्हा परिषदेमध्ये काही महिन्यांपूर्वी आढावा बैठक घेतली. या बैठकीत काम पूर्ण करण्यासाठी मार्चअखेरची डेडलाईन दिली होती. तसेच कामात हलगर्जीपणा करणार्‍यांवर कारवाईचा इशारा दिला होता. मात्र अजून 456 योजना अपूर्ण आहेत. त्यामुळे पालकमंत्री आता काय भूमिका घेणार, याची चर्चा आहे.

दर्जाबाबत अनेक तक्रारी

काही गावांत झालेली काम दर्जेदार आहेत. मात्र अनेक गावांत सुरू असलेले आणि झालेल्या कामात दर्जा नसल्याच्या तक्रारी गावकर्‍यांनी प्रशासनाकडे केल्या आहेत. या तक्रारींची कोणी दखल घेत नसल्याचा उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष जावून तपासणी करण्याची मागणी होत आहे.

काही योजनेत पोटठेकेदारः कारवाईची मागणी

काही ठेकेदारांनी कार्यारंभ आदेश मिळूनही वेळेत काम सुरू केले नाही. काहीजणांनी कामे अर्धवट सोडली. तर काहींची कामे अपेक्षेपेक्षा कमी प्रमाणात झाली आहेत. काही गावात सुरू असलेल्या कामात दिरंगाई सुरू आहे. नेतेमंडळींना हाताशी धरून काही ठिकाणी पोटठेकेदारांकडून कामे सुरू असल्याचे बोलले जाते. मात्र त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने यंत्रणेच्या कारभाराबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे.

SCROLL FOR NEXT