Latest

डोंगर, झाडी अन् कशाला गुवाहाटी; गुंडेगावचे नटलेले निसर्ग सौंदर्य खुणावतेय पर्यटकांना

अमृता चौगुले

पुढारी वृत्तसेवा, वाळकी: नगर तालुक्यातील गुंडेगावाला तीन बाजुंनी डोंगर रांगानी वेढा दिला आहे. सुमारे साडे आठशे हेक्टर वनक्षेत्र गावाला लाभले आहे. या परिसरात झालेल्या पावसामुळे डोंगर रांगानी हिरवा शालू पांघरला असून डोंगर माथ्यावरील नैसर्गिक धबधबे फेसाळत कोसळू लागले आहेत. वनक्षेत्रात स्वछंद बागडणारे विविधरंगी पक्षी, हरणांचे कळप अन् मोरांचे थवे मानवी मनाला भुरळ घालत आहेत. कशाला डोंगर, झाडी अन् गुहाहाटी ! निसर्ग सौंदर्याने नटलेले गुंडेगाव पर्यटकांना खुणावते आहे.

मागील काही वर्षापुर्वी दुष्काळ आणि पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या गुंडेगावने मागील पाच वर्षात समतल चर व ओढे रुंदी-खोलीकरणाची कामे वन विभाग , कृषी विभाग यांच्यामार्फत केली. सुमारे साडे आठशे हेक्टर वनक्षेत्रामध्ये पावसाचे वाहून जाणारे पाणी डोंगर व वनक्षेत्र परिसरात जिरविण्यासाठी केलेल्या विविध उपाययोजनामुळे गुंडेगावचे रुपडे पालटले आहे. समाधानकारक पाऊस झाला नसला तरी झालेल्या पावसाचे पाणी शेतशिवारातच जिरल्याने गावाची पाणीपातळी उंचावली असून गुंडेगाव हिरवेगार अन्‌ पाणीदार झाले आहे. डोंगर दऱ्यातून वाहणारे पाणी नालाबांध व तलावात अडविले असल्याने सर्वत्र दिसणारे पाणी, हिरवीगार डोंगर रांगामुळे गुंडेगावात 'कोकण'चे सौंदर्य अवतरल्याचा भास निसर्ग प्रेमींना होत आहे.

पावसाने डोंगर परिसरातील लहान मोठे धबधबे प्रवाहीत झाले आहेत. बहरलेल्या वृक्षांनी सजलेल्या डोंगररांगा , हिरवाशालु पांघरलेले निसर्ग सौंदर्य, नागमोडी वळणे घेत जाणारे डोंगर परिसरातील रस्ते, कडे कपारीतून फेसाळत वाहणारे धबधबे, अंगाला झोंबणारा गार वारा, मधूनच येणाऱ्या पावसाच्या सरी असा विलोभनीय निसर्गाचा मुक्त अविष्कार पाहण्यासाठी व निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद घेण्यासाठी स्थानिकांसह पर्यटक फेरफटका मारताना दिसत आहेत .

मागील पाच सहा वर्षापूर्वी दर वर्षी पाणी टंचाईचा अन् दुष्काळाशी झुंज देणारे गाव म्हणून गुंडेगावची ओळख होती. मात्र तीन बाजुंनी असलेल्या डोंगररांगा , साडे आठशे हेक्टर वनक्षेत्रांमध्ये सुमारे पाचशे हेक्टर वर समतलचर मारून पावसाचे पाणी डोंगर व जमिनीत जिरवले गेले. ठिकठिकाणी १६ वनतलाव, ७ बंधारे बांधून वाहून जाणारे पाणी अडविले. गाव पाणीदार झाले असून दुष्काळी ओळख पुसली गेली. वनतलाव, समतलचर, बंधारे भरून पाणी झिरपत डोंगर कपारीतून फेसाळत असून त्याचे धबधब्यात रूपांतर झाले आहे . निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक गुंडेगावकडे आकर्षित होत आहेत
– बाळासाहेब हराळ, मा . जि . प . सदस्य

वनक्षेत्र परिसरात दर वर्षी वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन केले जात आहे. चराई बंदी व कुऱ्हाड बंदी करून वृक्षांचे संगोपन करण्यात आले. गावातील कुटुंबांना वनसमिती मार्फत गॅसचे वाटप करून वनक्षेत्रातील वृक्ष तोड पूर्णत: बंद केली आहे. वनक्षेत्रात जलसंधारणाची कामे झाल्याने वनक्षेत्र हिरवेगार झाले आहे . निसर्ग सौदर्य पाहण्यासाठी दूरवरून पर्यटक गुंडेगावला येत आहेत .
– मानसिंग इंगळे , वनरक्षक गुंडेगाव

डोंगर कपारीतून फेसाळत वाहणारा धबधबा कोसळत असताना धबधब्याखाली आंघोळीची मजा लुटण्याचा मोह पर्यटकांना होत आहे . निसर्गरम्य ठिकाणी पर्यटनासाठी पिकनिक पॉईट तयार करणे गरजेचे आहे . पर्यटक वाढीसाठी सोयी सुविधेच्या उपाययोजना केल्याने पर्यटकांना पर्यटनाचा मनमुराद अन् बिनधास्त आनंद घेता येईल .
– संजय भापकर, प्रसिद्धी प्रमुख, निसर्ग व सामाजिक पर्यावरण

SCROLL FOR NEXT