Latest

सभागृहात नौटंकी न करता प्रत्यक्ष परिस्थिती तपासावी, गुलाबरावांचा खडसेंना पलटवार

गणेश सोनवणे

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी हिवाळी अधिवेशनात बोदवड तालुक्यातील पाणी पुरवठा योजनेवरुन राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढविला होता. यावर बोलताना गुलाबराव पाटील यांनी पलटवार केला असून, आमच्या कार्यकाळात ९० कोटी रुपये निधीतून या ४४ गावांना पाणी मिळाले. त्या गावांमध्ये १५ ते २० दिवसाआड पाणी मिळते, त्यामुळे नव्याने योजना मंजूर करण्यात आली आहे. केवळ सभागृहात नौटंकी करुन चालत नाही तर प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच आहे, अशा शब्दात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार खडसेंवर पलटवार केला.

बोदवड तालुक्यात ४४ गावांसाठी नव्याने पाणी पुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. यावरुन आमदार एकनाथराव खडसे यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधाला. सभागृहात बोलताना आमदार खडसे म्हणाले, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे आपल्याला पाणीवाले बाबा असे म्हणून घेतात. केंद्राच्या माध्यमातून जलजीवन योजनेतून पाणी देण्याचे काम सुरू आहे. २४ तास शुद्ध आणि मुबलक पाणीपुरवठा देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र जेथे आवश्यकता आहे त्या ठिकाणी योजना न राबवता, ज्या ठिकाणी गरज नाही तेथे मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जात असल्याचा आरोप आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे.

ठेकेदारांच्या हितासाठी योजना…

बोदवड तालुक्यातील ४४ गावांना पिण्याचे पाण्याची योजना मंजूर करण्यात आली, ही बाब चांगली आहे. परंतु चार महिन्यापूर्वीच ९२ कोटींची सार्वजनिक पाणीपुरवठा योजना या ४४ गावांमध्ये मंजूर केली होती. ती सुरू देखील झाली आहे आणि या गावांना पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. असे असले तरी या गावांसाठी पुन्हा नव्याने राबवली जात आहे. गेल्या ३५ वर्षात ३५ वेळा या गावांमधील पाण्याचे सोर्स तपासले. मात्र एकदाही जीएसडीने या ठिकाणी पाणी नसल्याचे सांगितले. मात्र रातोरात काय चमत्कार झाला की या गावांमध्ये पाणी असल्याचे दाखले वाटप केले. त्यामुळे या योजनेत काहीतरी काळभैर असल्याचे शंका आमदार खडसे यांनी उपस्थित केली. तसेच पाणी लागल्याशिवाय योजना मंजूर करण्यात येऊ नये आणि टेंडर काढू नये, काढल्यास शासनाचा जो खर्च वाया जाईल त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे. या गावांमध्ये आधीच चार ते पाच योजना राबवण्यात आल्या आहेत. संपूर्ण गावात पाईपलाईनचे जाळे तयार झाले आहे. त्यात आता पुन्हा नव्याने योजना कशासाठी यातून लोकांना पाणी मिळणार कि ठेकेदारांना अशा सवालही खडसे यांनी उपस्थित केला.

आमचा तो बाळू, तुमचा काळू…

एकनाथ खडसे यांच्या आरोपांवर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ४४ गावांच्या योजनेत वीस ते पंधरा दिवसात पाणी मिळते. सभागृहात बोलणं केवळ नोटंकी आहे मी त्या खात्याचा मंत्री असून प्रत्यक्ष गावांमध्ये काय परिस्थिती आहे याची मला जाणीव आहे. ९ कोटी रुपये आमच्या काळात या गावांसाठी दिले तेव्हा पाणी मिळाले. मात्र त्यांनी दुसऱ्यांच्या खात्यावर, पोलिसांवर आरोप केले त्यांच्या काळात मुक्ताईनगरमध्ये चंदेल नावाचा पीआय सात वर्ष ठाण मांडून होता. मी केला तर काळू तुम्ही केला तर बाळू ही बाब चुकीची आहे, अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT