Latest

IPL 2023 : गुरू-शिष्यांमध्ये झडणार सलामी

Arun Patil

अहमदाबाद, वृत्तसंस्था : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) उद्यापासून म्हणजेच 31 मार्चपासून सुरू होत आहे. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पहिला सामना खेळवला जाणार आहे. 31 मार्च रोजी संध्याकाळी गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. हे मैदान आधी मोटेरा क्रिकेट स्टेडियम म्हणून ओळखले जात होते, आता मोटेरा स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम करण्यात आले आहे.

आयपीएलचा 2023 चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. ही लढत गुरू आणि शिष्य यांच्यात होणार आहे. एका बाजूला महेंद्रसिंग धोनी तर दुसरीकडे हार्दिक पंड्या. हार्दिकने गेल्या वर्षी त्याच्या नेतृत्वाखाली गुजरातला विजेतेपद मिळवून दिले होते. यावेळी दोन्ही संघांना विजयाने मोहिमेची सुरुवात करायची आहे.

खेळपट्टी : नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली आहे; परंतु येथे वेगवान गोलंदाजांना सुरुवातीच्या षटकांमध्ये मदत मिळते आणि ते फलंदाजांसाठी अधिक घातक असते. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना लवकर उसळी मिळण्यात मदत करू शकते. नरेंद्र मोदी स्टेडियमवर आऊटफिल्ड संथ नसले तरी मोठ्या सीमारेषेमुळे येथे एकेरी-दुहेरीवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल.

नाणेफेक : नरेंद्र मोदी स्टेडियमवर नाणेफेक जिंकणार्‍या कर्णधाराने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घ्यावा, असे जाणकारांचे म्हणणे आहे. या मैदानावर जिंकण्यासाठी प्रथम फलंदाजी करणार्‍या संघाने 180 पर्यंत धावा केल्या पाहिजेत, कारण या मैदानावर 160-170 धावांचा डोंगर सहज उभारता येतो.

हवामान : अहमदाबादमध्ये धुके पाहायला मिळेल. सामन्याच्या दिवशी तापमान 35 टक्के आर्द्रता आणि 2.5 किमी प्रतितास वार्‍यासह सुमारे 27 डिग्री सेल्सियस असण्याची अपेक्षा आहे आणि द़ृश्यमानता 4 किमी आहे. खेळादरम्यान पावसाची 38 टक्के शक्यता वर्तवण्यात आली आहे.

थेट प्रक्षेपण : नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणारा चेन्नई आणि गुजरात संघ यांच्यातील हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. तर या सामन्याची नाणेफेक 7 वाजता होईल. याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्टस् नेटवर्कवर होईल.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन (IPL 2023)

गुजरात टायटन्स : शुभमन गिल, वृद्धिमान साहा, केन विल्यम्सन, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड (यष्टिरक्षक), राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, शिवम मावी, यश दयाल.

चेन्नई सुपर किंग्ज : डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, बेन स्टोक्स, अंबाती रायुडू, मोईन अली, शिवम दुबे, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार) (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, दीपक चहर, तुषार देशपांडे, मिचेल सँटनेर.

13 भाषांमध्ये कॉमेंट्री (IPL 2023)

आयपीएलमध्ये यावेळी प्रथमच पंजाबी, ओरिया आणि भोजपुरी भाषांमध्येही कॉमेंट्री होणार आहे. म्हणजेच यावेळच्या आयपीएलमध्ये हिंदी आणि इंग्रजीशिवाय अन्य 13 भाषांमध्ये कॉमेंट्री ऐकायला मिळणार आहे. यात इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, मराठी, गुजराती, बंगाली, मल्याळम, पंजाबी, ओरिया आणि भोजपुरी या भाषांचा समावेश आहे. स्टार स्पोर्टस्वर हिंदी, इंग्रजीसह 9 भाषांमध्ये कॉमेंट्री होईल. तर जिओ सिनेमा पवर 13 भाषांमध्ये असेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT