पुढारी ऑनलाईन : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी ( Gujarat polls ) भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये क्रिकेटपट्टू रविंद्र जडेजा यांच्या पत्नी रीवाबा जडेजा यांच्याही नावाचा समावेश आहे.
भाजपने उमेदवारांच्या पहिल्या यादीमध्ये १६० उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी ही नावे जाहीर केली. यामध्ये क्रिकेटपट्टू रविंद्र जडेजा यांच्या पत्नी रीवाबा जडेजा यांना भाजपने जामनगर दक्षिण मतदारसंघातून ( Gujarat polls ) तिकीट दिले आहे.
रिवाबा जडेजा या मूळच्या गुजरातमधील राजकोटच्या रहिवाशी आहेत. त्यांचे वडिल हे व्यापारी आहेत. मेकॅनिकल इंजनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर त्या दिर्घकाळ सामाजिक कार्यात देखील सहभागी होत्या. २०१६ मध्ये रिवाबा या रविंद्र जडेजासोबत विवाह बंधनात अडकल्या. भाजपमध्ये येण्यापूर्वी त्या राजपूत समाजाच्या करणी सेना या संघटनेत सदस्य होत्या. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून त्या भाजप पक्षाच्या कार्यक्रमात ( Gujarat polls ) स्टेजवर दिसत होत्या.
रवींद्र जडेजाचे वडील अनिरुद्ध सिंग जडेजा आणि बहीण नैना हे देखील राजकारणात आहेत. नयना जामनगरमधील महिला काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. रवींद्र जडेजा अवघ्या १७ वर्षांचे असतानाच त्याच्या आईचे निधन झाले. यानंतर बहीण नैनाने जडेजाचा सांभाळ करत त्यांची संपूर्ण जबाबदारी घेतली आणि त्याला क्रिकेट खेळण्यासाठी प्रेरित केले.
गुजरात विधानसभेच्या निवडणुका या दोन टप्प्यात होणार आहेत. १ आणि ५ डिसेंबरला मतदान होणार असून, ८ डिसेंबरला या निवडणूकीचा निकाल लागणार आहे. त्याचदिवशी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकालही जाहीर होणार आहेत. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ९९ तर, काँग्रेसला ७७ जागा मिळाल्या होत्या.