Latest

Gujarat News : उत्साहाने हिरे गोळा केले; पण नशीबच रुसले

मोहन कारंडे

गांधीनगर : गुजरातची आर्थिक राजधानी अशी ओळख असलेले सुरत शहर डायमंड सिटी म्हणूनही प्रसिद्ध आहे. तेथे वराछा परिसरातील डायमंड मार्केटमधील एक व्हिडीओ (Diamond Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात हिरे व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर पडलेले हिरे गोळा करताना दिसत आहेत.

नेहमीप्रमाणे सर्वसामान्यांची ये-जा सुरू असतानाच वराछा येथील रस्त्यावर हिरे सांडल्याची माहिती मार्केटमध्ये वाऱ्यासारखी पसरली. यानंतर हिरे गोळा करायला झुंबड उडाली. दुकानदार, सर्वसामान्य जनता हातातील कामे टाकून हिरे जमा करू लागले. अनेकांनी ही घटना कॅमेऱ्यात कैद केली. काहींना एकही हिरा मिळाला नाही, तर काहींना भरपूर हिरे सापडले. मात्र, हिऱ्यांची पारख करताच सगळ्यांना धक्का बसला. कारण, हे हिरे अमेरिकन डायमंड होते. त्यांची किंमत अगदीच कमी असते. ही बाब समजताच हिरे गोळा करणाऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले. खाणीतून काढला जाणारा, सापडणारा हिरा अतिशय मौल्यवान असतो. लॅबमध्ये तयार करण्यात आलेल्या हिऱ्यांची किंमत त्याच्यापेक्षा बरीच कमी असते. खाणीतून काढलेला खरा हिरा एक लाखाचा असल्यास लॅबमध्ये तयार करण्यात आलेल्या हिऱ्याची किंमत १५ हजारांच्या घरात असते. या तुलनेत अमेरिकन डायमंड किलोच्या भावाने विकले जातात.

SCROLL FOR NEXT