सुरत, वृत्तसंस्था : नयना मांडवी (Nayana Mandvi) सुरतच्या दिंडोलीत राहणारी एक बांधकाम मजूर. तिला वीर हा अडीच वर्षांचा मुलगाही. झारखंडमधील एका युवकावर तिचे प्रेम जडले. मुलगा सोबत असेल तर मी काही तुझ्याशी लग्न करणार नाही, तुला सोबत नेणार नाही, अशी अट या युवकाने घातली. वीर हा आता तिच्या सुखातील अडथळा होता. मग नयनाने वीरची हत्या केली… मृतदेहाच्या विल्हेवाटीसाठी 'दृश्यम' चित्रपट पाहिला. पोलिसांना खूप चकविले; पण पोलिसांनी तिचे बिंग फोडलेच! (Gujarat News)
वीरची हत्या केल्यानंतर 27 जून रोजी नयना हिने पोलिस ठाणे गाठले आणि मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. पोलिसांनी सलग 3 दिवस वीरचा शोध घेतला. नयना राहते, त्या दिंडोलीतील बांधकामाच्या ठिकाणी असलेले सारेच सीसीटीव्ही फुटेज तपासले. कुठल्याही फुटेजमध्ये बांधकामाच्या परिघाबाहेर पडताना वीर दिसला नाही. मग नयनावरच अवघा तपास केंद्रित झाला. नयना पोलिसांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देत नव्हती. पोलिसांनी पट्टीचा श्वान मागविला.
बांधकामाच्या परिघाबाहेर श्वानही फिरकला नाही. तेथेच घुटमळत राहिला. नयनाने मग या झारखंडमधील प्रियकरावर आळ घेतला. पोलिसांनी या प्रियकराचे लोकेशन ट्रेस केले. वीर बेपत्ता झाल्यापासून तो सुरतच्या जवळपासही फिरकला नसल्याचे स्पष्ट झाले. आता हत्या कुणी केली, हे पोलिसांना वेगळे सांगण्याची गरज नव्हती. नयना (Nayana Mandvi) अखेर मोडली. तिने हत्येची कबुली दिली; पण मृतदेहाबाबत वारंवार घूमजाव करत होती.
जिथे मृतदेह पुरला म्हणून तिने सांगितले, तिथला मोठा भाग पोलिसांनी जेसीबीने खणून काढला; पण काही हाती लागले नाही. मग मृतदेह तलावात फेकून दिल्याचे तिने सांगितले. पोलिसांनी पाणबुड्यांच्या मदतीने शोध घेतला; मात्र उपयोग झाला नाही. अखेर बांधकामाच्याच ठिकाणी शौचालयासाठी बनवलेल्या खड्ड्यात तिने मुलाचा मृतदेह टाकल्याचे कबूल केले. बांधकाम पाडून पोलिसांनी मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला. (Gujarat News)