Latest

Gudi Padwa 2024 : गुढीपाडवा विजयोत्सवाचा

Arun Patil

होळी, रंगपंचमी सरली की, वेध लागतात ते गुढीपाडव्याचे. चैत्र महिना म्हणजे सृष्टीचा बहर घेऊन येणारा, नवचैतन्याची बरसात करणारा महिना. म्हणूनच या चैत्री पाडव्याचे महत्त्व आजही अनन्यसाधारण आहे. गुढीपाडवा अर्थात चैत्री पाडवा म्हणजे मुहूर्तशास्त्रामध्ये जे साडेतीन शुभ मुहूर्त सांगितले आहेत, त्यांपैकी एक मुहूर्तदिन. ब्रह्मदेवाने याच दिवशी विश्वाची निर्मिती केली, असे मानले जाते. त्यामुळे गुढीला ब्रह्मध्वज, असेही म्हणतात.

भगवान विष्णूंनी शंकासुराचा वध करण्यासाठी जो मत्स्यरूपी अवतार घेतला, तोही गुढीपाडव्याच्या दिवशीच. अयोध्यापती श्रीराम लंकेवर विजय मिळवून अयोध्येला परतले, तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत गुढ्या उभारून मोठ्या आनंदाने केले. त्यामुळे गुढीपाडवा हा विजयोत्सवाचा दिन आहे आणि गुढी म्हणजे केवळ ब्रह्मध्वजच नव्हे, तर तो विजयध्वजही आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशीच प्रभू श्रीरामांचा चौदा वर्षांचा वनवास संपला होता म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवसही आहे. चैत्र महिन्याच्या प्रतिपदेला आपल्याकडे गुढीपाडवा साजरा करतात. हिंदू धर्मीयांच्या कालगणनेनुसार या दिवसापासून नव्या वर्षाला सुरुवात होते; कारण ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली होती. त्यानंतर पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली. या दिवशी विश्वातील तेजतत्त्व आणि प्रजापती लहरी मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिकाधिक संचित करण्याचा प्रयत्न करतो. चैत्र महिना येतो तो मुळी सृष्टीचा बहर घेऊनच! या महिन्यापासूनच ऋतुराज वसंताचे आगमन होते. संपूर्ण सृष्टी जणू नवा जन्म घेऊन बहरलेली असते. वृक्ष-वेलींना पालवी फुटलेली असते. हिरव्या रंगाच्या पानांसह रंगीबेरंगी फुलांच्या मोहक छटा सर्वत्र दिसत असतात. कोकिळेचे मधुर कुजन ऐकायला येत असते. सृष्टी जणू आपले सारे वैभव मुक्तहस्ताने उधळत असते. अशा या उधाळलेल्या ऋतूचे अर्थात नववर्षाचे स्वागतही तेवढ्याच उत्साहाने केले जाते.

या महिन्याला 'चैत्र' हे नाव 'चित्रा' नक्षत्रावरून पडले आहे; कारण या महिन्यात येणारी पौर्णिमा चित्रा नक्षत्रावर येते. चैत्र हा शब्द 'चित' या संस्कृत शब्दापासून बनला आहे. चित्र म्हणजे विविधता. या कालावधीत सृष्टीने जणू विविधतेचा ध्यासच घेतलेला असतो. ती विविध रूपात नटलेली असते. या सृष्टी रूपाची आठवण म्हणूनही या महिन्याला चैत्र असे म्हणतात. चैत्र महिन्याचा पहिला दिवस अर्थात गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. कुठलेही शुभ काम या दिवसापासून सुरू करता येते. हा संपूर्ण दिवसच उत्तम मानला जातो. महाराष्ट्रात आपण शालिवाहन शके पद्धती कालगणनेसाठी वापरतो. ती याच दिवसापासून सुरू होत असते. शालिवाहन राजाने शालिवाहन शकास सुरुवात केली. शक सुरू करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालिवाहन राजाचे महत्त्व आहे. शालिवाहनाने मातीचे सैन्य तयार केले. त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला. मग या सैन्याच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूचा पराभव केला, अशी मान्यता आहे. या विजयाप्रीत्यर्थ शालिवाहन शके सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते. या दिवशी पंचाग वाचन आणि देवी सरस्वतीचे पूजन केले जाते.

गुढीपाडवा साजरा करण्यामागे पुराणात काही दाखले सांगितले जातात. प्रभू रामचंद्रांनी आपला वनवास संपवून, रावणाचा वध करून अयोध्या नगरीत याच दिवशी पुन:प्रवेश केला होता. आपल्या लाडक्या रामरायाचे स्वागत प्रजाजनांनी गुढ्या, तोरणे उभारून आनंदाने केले. त्या दिवसाची आठवण म्हणूनही गुढीपाडवा साजरा केला जातो. गुढीपाडव्याबाबत आणखी एक कथा पुराणांमध्ये आढळते. प्राचीन काळात चेदी नावाचा देश होता. तेथे वसू नावाचा राजा राज्य करीत होता. तो अतिशय धार्मिक, निष्ठेने राज्य करणारा आणि प्रजाहितदक्ष राजा होता. एकदा तपश्चर्या करताना देवाने प्रसन्न होऊन त्याला एक वेळूची काठी दिली. या काठीची पूजा करून त्याने ती आपल्या राजवाड्यासमोर लावली. तो दिवस गुढीपाडवा होता. पौराणिक कथांमधील संदर्भांचे सार काढल्यास गुढीपाडवा हा विजयोत्सवाचा, चैतन्याचा, आनंदाचा दिवस आहे आणि गुढी ही शौर्याचे, विजयाचे, आनंदाचे प्रतीक आहे.

गुढी उभारणे म्हणजे यशाची पताका उंचावणे. या नव्या वर्षानिमित्त पहिल्या दिवशी यशाचा विचार करावा, नवे संकल्प करावेत, गुढीप्रमाणे आकाशाला गवसणी घालण्याची स्वप्ने पाहावीत. अनेक वर्षांपासून आपल्याकडे गुढीपाडव्याला घराघरांत असा विजयध्वज उभारला जातो. बाजारातून बांबूची काठी आणून ती धुवून त्याला सुवासिक तेल लावून स्नान घातले जाते. साखरेच्या गाठींची माळ, फुलांची माळ आणि कडुनिंबाचा पाला त्यावर बांधला जातो. त्यावर कोरा खण किंवा जरीची साडी बांधून त्यावर तांब्याचा किंवा चांदीचा तांब्या ठेवला जातो. त्याची हळद-कुंकू लावून पूजा, आरती केली जाते आणि आपल्या घराच्या दारासमोर ही गुढी उभारली जाते. सूर्यास्तापूर्वी ती उतरवली जाते. या दिवशी घरात पुरणाचे गोडधोड पदार्थ बनवले जातात. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाचे खूप महत्त्व आहे. या दिवशी कडुनिंबाची पाने वाटून त्यात गूळ घालून त्याच्या गोळ्या बनवतात आणि त्या खातात. कडुनिंबाचा पाला आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असतो. शरीरशुद्धी करण्याबरोबरच तो बल, बुद्धी, तेजाची वृद्धी करणारा असतो. पाडव्याच्या निमित्ताने या गुणकारी झाडाची आठवण करून दिली जाते. त्याला रूपकात्मकतेच्या परिप्रेक्ष्यातून पाहता, आयुष्यात सुख आणि दु:ख हातात हात घालून येत असतात, हे जीवनाचे सार सांगितले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT