Latest

गुढीपाडवा : मनोविजयाचा उत्सव!

Arun Patil

तेलहळदीने सुस्नात काठी, वरती चांदीची लोटी, लाल चाफा हारात गुंफलेला, गाठीचा हार, कडुनिंबाची त्याच्या मोहोरासकट डहाळी आणि जरीच्या साडीचा किंवा पैठणीचा काडीला नेसवलेला घोळदार फलकारा आणि सजलेली गुढी दारात उभी करणे हा मनोविजयाचा उत्सव आहे. गुढीपाडव्याशी जोडलेल्या अनेक कथांचे मर्म जाणून घेतल्यास दुष्टांवर सुष्टांनी मिळवलेला विजय, अनिष्टावर ईष्ट शक्तीने केलेली मात हे असल्याचे दिसून येईल. मराठी नववर्षाच्या या पहिल्या तिथीपासून चैत्रांगणाची रांगोळी, श्रीरामाचे नवरात्र अशा मांगल्यदायी सणउत्सवांचा प्रारंभ होतो.

चैत्र महिना हा उत्साहाचा, नवलाईचा आणि सृष्टीचा. आपल्याकडे वर्षातल्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगळेच आहे. प्रत्येक दिवसाशी काहीतरी जोडलेले आहे. कोणत्याही पंचांगात, दिनदर्शिकेत एकही दिवस रिक्त दिसत नाही. कारण आपण उत्सवप्रिय, परंपराप्रिय लोक आहोत. आणि चैत्र महिना हा तर विशेषत्वाने महत्त्वाचा आहे. कारण यातील पाडव्यापासून आपले नवीन वर्ष सुरू होते. व्यापारी लोकांचे नवीन वर्ष हे दिवाळीतल्या पाडव्यापासून सुरू होते. तसाच आणखी एक महत्त्वाचा पाडवा हा श्रावणातल्या पिठोरी अमावस्येनंतर येतो. परंतु, चैत्री पाडव्याचे महत्त्व काही वेगळेच आहे. घरे धान्यांनी भरलेली असतात. वातावरण उबदार आणि मनाला उल्हासित करणारे असते. फारशी थंडी किंवा उन्हाचा तडाखा वाढलेला नसतो. सरत्या वर्षाच्या सुखद खुणा मनावर, शरीरावर रेगांळत असतात.

वसंत मनात-वनात असतो. कोकिळेचे कूजन मनाला आनंद देत असते. आंब्यांच्या झाडावर मोहोर जाऊन छोट्या-छोट्या बाळकैर्‍या दिसू लागलेल्या असतात. नवीन आणि काहीतरी चांगले घडणार याची चाहूल वातावरण देत असते आणि आपण ती घेत असतो. असा हा बोलक्या मौनाचा पाठशिवणीचा खेळ रंगात येत असताना नवीन वर्षाची चाहूल द्यायला पाडवा दारात उभा राहतो, तो आपले मनापासून सर्वांनी स्वागत करावे, या इच्छेने! तेलहळदीने सुस्नात काठी, वरती चांदीची लोटी, लाल चाफा हारात गुंफलेला, गाठीचा हार, कडुलिंबाची त्याच्या मोहोरासकट डहाळी आणि जरीच्या साडीचा किंवा पैठणीचा काडीला नेसवलेला घोळदार फलकारा आणि सजलेली गुढी! गुढीपाडवा हा सर्वांसाठी आनंददायी राहिला आहे. नवे वर्ष, नवे संकल्प आणि नवीन भावना एवढे बळ माणसाला जगण्यासाठी खूपच खूप काही देऊन जाते.

या सणाची उपपत्ती अनेक प्रकारे सांगण्यात आली आहे. या दिवशी ब—ह्मदेवाने चैत्र शुद्ध प्रतिपदेला विश्वाची निर्मिती केली, असे पुराणात सांगितले आहे. त्यामुळे विश्वाचा वाढदिवस आपण या दिवशी पाडव्याच्या रूपाने साजरा करतो. या सणामागे आणखी एक कथा आहे. वसु नावाचा एक राजा तपश्चर्या करून खूप यशस्वी झाला. त्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन स्वर्गातील अमरेंद्राने त्याला चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी गौरवले. त्यामुळे या दिवशी पाडव्याचा आनंदोत्सव साजरा केला जातो.

याखेरीज शालीवाहनाचीही कथा गुढीपाडव्याशी संबंधित आहे. शालिवाहनाच्या मुलाने मातीचे सैन्य तयार करून त्यामध्ये जीव भरला आणि त्यांच्या माध्यमातून त्याने शत्रूंचा पाडाव केला. त्यामुळे शालीवाहन याच्या नावाने 'शक' सुरू झाला. मातीच्या गोळ्यात जीव भरणे म्हणजे त्यांच्याप्रमाणे अविचल, दुर्बल, थंड, निर्जीव वस्तूंमध्ये किंवा तशा प्रवृत्तींच्या माणसांमध्ये चैतन्य निर्माण करणे आहे. या माध्यमातून समाजातील स्वाभिमानाचे अस्तित्व जागृत केले जाते. शालिवाहनाची दुसरी एक कथा पैठणच्या शालिवाहन राजाशी संबंधित आहे.

पैठणच्या शालिवाहन राजाने अत्याचारी असणार्‍या शक लोकांचा पराभव करून त्यांच्या जाचापासून लोकांची मुक्तता केली. त्या प्रीत्यर्थ शालिवाहन शक सुरू झाले. कालगणनेत शकांचा पराभव करू शकतो, तो शालिवाहन आणि ज्याचा पराभव होतो, तो शक असा शब्द वापरण्यात आला आहे. त्यामुळे शालिवाहन शकमध्ये हे दोन्ही शब्द वापरण्यात आले आहेत. पाडव्याच्या निमित्ताने पंचांगाची पूजा करण्यात येते. पंचांग हे कालमापन आहे. पंचांग म्हणजे तिथी, वार, नक्षत्र, योेग आणि करण. या पाच अंगांची माहिती करून घेऊन त्यांची पूजा केली, तर त्याचा उपयोग वर्षभर होेतो, अशी समजूत आहे.

गुढीपाडव्याच्या दिवसापासून श्रीरामांचे नऊ दिवसांचे नवरात्र सुरू होते. साडेतीन मुहूर्तातला एक मुहूर्त म्हणूनही हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. घरबांधणी, नवीन वास्तूत प्रवेश, लग्न, कोणतेही शुभकाम या दिवशी केले जाते किंवा जाणून या दिवशी ते केले जाते. कडुनिंबाची कोवळी पाने आणि गूळ एकत्र वाटून त्याची चटणी बनविली जाते. खरे तर हाच मुख्य प्रसाद गुढीला दाखविला जातो.

यामागील कारण असे की, पाडव्यापासून वातावरणातला उष्मा दिवसागणिक वाढत जातो. पुढे येणारा वैशाखातला प्रपाती उन्हाळा सोसण्याची ताकद शरीरात असावी तेवढा थंडावा मिळावा म्हणून या चटणीचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद म्हणून सर्वांनी ग्रहण करावा, अशी समजूत आहे. ती आजही मोठ्या भाविकतेने पाळली जाते. आपल्याकडे प्रत्येक सणाला रांगोळीचे अनन्यसाधारण महत्त्व असते. आजही ते पाळले जाते. किंबहुना अधिक अगत्याने आजची नवीन पिढी ही रांगोळी परंपरा जपताना दिसते किंवा असेही म्हणू शकतो की, त्यांनी त्यात आणखी विविधता आणलेली आहे. रांगोळी चैत्रांगणाला असे मानतात की, लक्ष्मण रेषा हीदेखील रांगोळीनेच आखलेली होती. ती रांगोळीची रेघ होती ती ओलांडल्यामुळेच सीतेवर अपहरणाचे संकट कोसळले होते.

आजही हा समज काही ठिकाणी द़ृढ आहे. चैत्रांगण हे एक रांगोळीचे नाव आहे. ते या चैत्र महिन्यातील पाडव्यापासून घरासमोर काढायला सुरुवात करतात. ही रांगोळी घराची शोभा तर वाढवतेच; पण घराचे अज्ञात दुष्ट शक्तींपासून रक्षणदेखील करते, असा समज आहे. या चैत्रांगणात निसर्गाचा भाव दिसून येतो. या महिन्यात गौर माहेरपणाला येते. निसर्गात उष्णता वाढत जाते तेव्हा गौरीला शांतवण्यासाठी विंझणवारा घालतात. तिच्या दोन्ही बाजूला चवर्‍या, तर शीतलतेसाठी चंद्र, गायीची पावले, लक्ष्मीचे प्रतीक हत्ती, औषधी वनस्पती म्हणून तुळस, अशी अनेक प्रतीकात्मक चिन्हे या चैत्रांगणाच्या रांगोळीत आवर्जून काढतात.

पूर्वीपासूनचा असा समज आहे की, दारात जर पाडव्यापासून चैत्र महिनाभर रोज चैत्रांगण काढले, तर वर्षाच्या सुरुवातीपासून घरात शुभकार्ये आनंदाने पार पडतात. गौरीच्या पावलांनी, तिच्या रांगोळींनी लक्ष्मी प्राप्त होते. त्या घरात वर्षभर सुख, शांती, नांदते. त्यामुळे आजही ही प्रथा मोठ्या श्रद्धेने पाळली जात असल्याचे दिसून येते. चैत्र पाडव्याच्या दिवशी या रांगोळीत गुढींचेही चित्र काढले जाते. उगवत्या सूर्याच्या पिवळ्या प्रकाशात रांगोळीतील गुढी नववर्षाचे स्वागत करताना सर्वत्र मंगलमय वातावरण असते. याच पवित्र दिवशी श्रीरामांचे विजयी आगमन अयोध्येत झाले होते, त्याही प्रित्यर्थ प्रजाजनांनी आपल्या लाडक्या राजाचे स्वागत गुढ्या उभारून केल्याचे संदर्भ दिसून येतात.

– सु. ल. हिंगणे, अध्यात्म अभ्यासक

SCROLL FOR NEXT