Latest

Neem : कडुनिंबाचे ‘असे’ असतात आरोग्याला लाभ

Arun Patil

मुंबई : हिंदूंचा वर्षारंभाचा दिवस म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदा. महाराष्ट्रात या दिवशी घरोघरी गुढ्या उभ्या केल्या जात असल्याने या दिवसाला 'गुढीपाडवा' असे म्हटले जाते. यंदा गुढीपाडवा 22 मार्चला येत असून या दिवशी सकाळी घरासमोर गुढी उभारली जाते. या दिवशी कडुलिंबाची कोवळी पाने खाण्याचीही प्रथा आहे. तसेच या दिवशी कडुलिंब घालून तयार केलेला प्रसाद घेण्यामागेही शास्त्र आहे. कडुलिंबाची कोवळी पाने, फुले, चण्याची भिजलेली डाळ, जिरे, हिंग आणि मध मिसळून हा प्रसाद तयार केला जातो. यामागे आरोग्याच्या द़ृष्टीने असलेले लाभही समजून घेणे आवश्यक आहे.

कडुनिंबाची पाने सदाहरित आणि सदापर्णी आहेत. त्याची पाने, फुले, खोड हे सर्व घटक औषधाच्या द़ृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. अनेक रोग दूर ठेवण्याचे गुण कडुलिंबात आहेत. कडुलिंबाची पाने ही जंतुनाशक असल्याने गुढीवर लावतात. कडुलिंबाची पाने खाल्ल्याने आरोग्यही चांगले राहात असून यामध्ये कफ, ताप, उष्णता, पित्तनाशक असे अनेक गुण कडुलिंबामध्ये समाविष्ट असतात. वसंत ऋतूमध्ये कफाचा प्रभाव अधिक असतो. त्यामुळे कडुलिंबाचा उपयोग जास्त प्रमाणात केला जातो.

यामुळे खोकला बरा होतो आणि आरोग्याला नवसंजीवनीही मिळते. केस व त्वचेसाठीही कडुनिंब गुणकारी असतो. तोंडाला येणारी दुर्गंधी, दात किडणे, हिरड्यांचे सुजणे यासारख्या समस्या दूर करण्यासाठी कडुलिंबाच्या पाल्याचा उपयोग केला जातो. कडुलिंबाच्या कडवटपणामुळे रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रणात राहते; पण मधुमेहींना कडुलिंबाच्या पाल्याचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. उच्च रक्तदाबाची समस्या नियंत्रित करण्यासाठी कडुलिंबाच्या पाल्यामुळे बरीच मदत मिळते.

SCROLL FOR NEXT