Latest

अबब…!औरंगाबाद नंतर पुण्यातही कुरिअरने आल्या तलवारी

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

आपल्याला हव्या असलेल्या वस्तू कुरीयर द्वारे झटकन एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठविण्याची सुविधा मिळते; मात्र काही महाभागांनी चक्क तलवारीच कुरीयरद्वारे मागविल्याच्या आणि कुरीयर कंपनीनेही त्या पाठविल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी सायंकाळी पुण्यात समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे कुरियरने परराज्यातून मोठ्या प्रमाणावर तलवारी आल्याचा प्रकार समोर आला होता. आता पुण्यातही तसाच प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

शुक्रवारी दुपारी नियंत्रण कक्षाला मार्केटयार्ड येथील डिसीडीसी कुरिअरद्वारे तलवारी आल्याची माहिती मिळाली. याबाबत स्वारगेट पोलिसांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना जाऊन माहिती घेण्यास सांगितले. मार्केटयार्ड येथील कुरिअर कंपनीच्या कार्यालयातून जाऊन तपासणी केली असता कुरिअर पर्सलमध्ये दोन धारदार चकाकणाऱ्या तलवारी पोलिसांना सापडल्या.

औरंगाबादच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी कुरिअरमध्ये अशा संशयास्पद पद्धतीने तस्करी केली जात असल्यास पोलिसांना काळविण्याबाबत कुरियर कंपन्यांना सांगण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर हा गुन्हा उघडकीस आला असून, स्वारगेट पोलिसांनी दोन तलवारी जप्त केल्या आहेत. या जप्त करण्यात आलेल्या तलवारी पंजाब येथील लुधियाना येथून मागविण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. ज्यांच्या नावे या तलवारी आल्या होत्या त्यांच्याकडे सध्या या अनुषंगाने तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी सांगितले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलिस उपनिरीक्षक अशोक येवले पुढील तपास करीत आहेत.

SCROLL FOR NEXT