पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताची सीमा सुरक्षित राहील, देशात शांतता आबाधित ठेवण्यात भारतीय सुरक्षा दलांची भूमिका महत्त्वाची आहे. भारतीय सैनिकांमुळे भारत भूमी सुरक्षित आहे. राष्ट्र निर्माणमध्ये जवानांचे योगदान मोठे राहिले आहे. नैसर्गिक आपत्ती, भूकंप, सुनामी, परकीय शत्रूचे आक्रमण अशा संकटसमयी सुरक्षा सेना देवदूत बनून पुढे येत असते, असे गौरवोद्गार पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी आज (दि. १२) येथे केले.
हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे भारतीय जवानांसोबत पंतप्रधान मोदी यांनी दिवाळी साजरी केली. या प्रसंगी ते बोलत होते. देशभरात दीपावली सणाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. यंदाही नेहमीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी आपली दिवाळी अहाेरात्र देशसेवेसाठी कार्यरत असणार्या जवानांबराेबर साजरी केली. हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे आपल्या शूर सुरक्षा दलांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी पोहोचलो असल्याचे ट्विट त्यांनी केले होते.
भारतीय जवान परिवारापासून दूर राहून आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करतात. आपला देश सुरक्षित राहण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करतात. प्राणाची बाजी लावून जवानांनी आपले कर्तव्य बजावले आहे. भूकंप, सुनामी, परकीय शत्रूंचा हल्ला अशा संकटांत जवानांनी नागरिकांचे रक्षण करण्याचे मोठे कार्य केले आहे. त्यामुळे आम्हा सर्वांना भारतीय सेना, जवान यांच्याबद्दल गर्व आहे. तुमच्या कार्याबद्दल देश आपला ऋणी आहे.
अयोध्या तिथेच आहे, जिथे भगवान राम आहेत, पण माझ्यासाठी अयोध्या आहे, जिथे भारतीय लष्कराचे जवान आहेत. मी गेल्या 30-35 वर्षांपासून मी तुमच्यासोबत दिवाळी साजरी केली आहे. मी जेव्हा पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री नव्हतो, तेव्हाही दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी मी कोणत्या ना कोणत्या सीमावर्ती भागात गेलो आहे. मी प्रत्येक वर्षाची दिवाळी कोणत्या ना कोणत्या सीमेवर जाऊन जवानांसोबत दिवाळी साजरी करत आलो आहे. जवानांसोबत माझी दिवाळी मधूर झाली आहे, अशा भावना मोदी यांनी यावेळी व्यक्त केल्या.
हेही वाचा