Latest

सरकारने फसवलं, नाफेडने कांदा खरेदी दर कमी केल्याने शेतकरी संतप्त

गणेश सोनवणे

[toggle title="राकेश बोरा " state="open"][/toggle]

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी २ लाख मेट्रिक टन कांदा २४१० रुपये प्रतिक्विंटलने खरेदी करण्याचा निर्णय घेताना क्विंटलला २४१० रुपये दरही जाहीर केला होता. मात्र, नाफेडच्या कांदा खरेदी केंद्रावर कांद्याला गुरुवारी प्रत्यक्षात २२७४ रुपये दर जाहीर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. नाफेडने कांद्याचे खरेदी दर १२५ रुपयांनी कमी केल्याने सरकार शेतकऱ्यांना फसवत असल्याची संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

कांद्याच्या बाजारभावात चढउतार होत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून कांदा खरेदीची घोषणा केली होती. आत्तापर्यंत साडेसात हजार टन कांदा नाफेडच्या माध्यमातून खरेदी करण्यात आला. आज अचानक नाफेडने कांद्याचे दर 125 रुपये कमी करत 2274 रुपये दर पुकारताच शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड रोष निर्माण झाला. तर दुसरीकडे नाफेडपेक्षाही लासलगाव बाजार समितीमध्ये दर अधिक मिळत असल्याचे चित्र होते. नाफेडच्या दराबाबत केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून अजिबात सकारात्मक उत्तरे मिळत नसल्याचा आरोप नाफेडच्या केंद्रावर कांदा विक्रीकरिता आलेल्या शेतकऱ्यांनी माध्यमांसमोर मांडला

बाजार समितीमध्ये दिवसभरात १०४२ वाहनांमधून १४,९७८ क्विंटल आवक होऊन उन्हाळ कांद्याला किमान ८०१ कमाल २४९१ रुपये, तर सरासरी २३५१ रुपये भाव मिळाला. बुधवारच्या तुलनेत सरासरी दरात १५० रुपये क्विंटलने भाव वाढले. मात्र, नाफेडने कांदादर वाढवण्याऐवजी १२५ रुपये प्रतिक्विंटलने दरात कपात केली. नाफेडने गत आठ-दहा दिवसांमध्ये कांदा खरेदीचा दर कमी करत २२७४ रुपयांवर आणत फसवणूक केल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

नाफेड पुन्हा कोलांटउडी

सुरुवातीला २२७४ हा भाव जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. शेतकऱ्यांची भावना लक्षात घेत नाफेडने ज्या शेतकऱ्यांना २२७४ रुपये भाव देत त्यांचा कांदा खरेदी केला, त्यांनाच २४१० रुपयांप्रमाणे पेमेंट देणार असल्याचे नाफेडने गुरुवारी सायंकाळी उशिरा जाहीर केले. शेतकऱ्यांचा रोष शमविण्यासाठी नाफेडला पुन्हा कोलांटउडी मारावी लागली.

पाकिस्ताननेही वाढवले कांद्यावरील निर्यात शुल्क

भारताने कांद्यावर निर्यात ४० टक्के निर्यात शुल्क आकारल्यानंतर पाकिस्तान सरकारनेदेखील कांद्यावरील किमान निर्यात शुल्क १६५ डॉलवरून २२० डॉलर प्रतिमेट्रिक टन केले. किरकोळ कांदा महाग होण्याची शक्यता लक्षात घेत तेथील सरकारने निर्यात मूल्य दरात वाढ केली आहे. तर बांगलादेश सरकारने कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी तब्बल नऊ देशांबरोबर कांदा खरेदीचे करार केले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT