Latest

16 आमदार अपात्र ठरले, तरी सरकार पडणार नाही : अजित पवार

Arun Patil

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार लवकरच सत्तेत सहभागी होणार असल्याची चर्चा गेले काही दिवस राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र आपण अमित शहा यांना भेटलो नाही. 16 सेना आमदार अपात्र ठरले तरी संख्याबळाचा विचार करता भाजप सरकारला धोका नाही, अशी तडाखेबाज टोलेबाजी करीत विविध चर्चा त्यांनी निरर्थक ठरविल्या.

महाविकास आघाडीच्या सभेच्या निमित्ताने ते रविवारी नागपुरात माध्यमांशी बोलत होते. कुणी काय चर्चा करावी हा त्यांचा प्रश्न आहे. शिवसेना नेत्यांकडून याबाबत उघडपणे प्रतिक्रिया दिली जात आहे. त्यातच नागपूरमध्ये होत असलेल्या वज्रमूठ सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विदर्भाचे नेते अनिल देशमुख बोलणार आहेत. मी संभाजीनगरला बोलल्याने नागपुरात बोलणार नाही. प्रत्येक सभेत प्रत्येक पक्षाचे दोनच नेते बोलणार हे आधीच ठरले आहे, असे सांगत त्यांनी हा प्रश्नही योग्यरीत्या टोलविला.

अजित पवार म्हणाले, मला एक कळत नाही की, दोन दिवस बघतोय, गुलाबराव पाटील बोलले, उदय सामंत बोलले, दादा भुसे बोलले. अनेकांची वक्तव्ये मी ऐकली. या सगळ्यांचे एवढं प्रेम का ऊतू चालले आहे ते कळायला मार्ग नाही. मी माझी भूमिका तुमच्यासमोर ठेवली आहे. इथेही अजित पवार येणार की नाही, आले तर भाषण करणार की नाही करणार, बसणार तर कुठे बसणार, अशी चर्चा लोकांनी सुरू केली होती, अशी मिश्कील टोलेबाजीही त्यांनी केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होम पीचवर ही सभा होत असल्याचेही बोलले जात आहे, त्यावर प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्यात कुणाची ना कुणाची होम पीच असणारच आहे. आम्ही राज्याच्या वतीने तिथे सभा घ्यायला जातोय. जसे त्यांचे होम पीच आहे, तसे अनिल देशमुख, सुनील केदार यांचेही होम पीच आहे. नितीन राऊत यांचेही होम पीच आहे, असे ते म्हणाले.

मांडले संख्याबळाचे गणित

पवार यांनी सत्ताधार्‍यांकडील सदस्यांच्या आकडेवारीबाबत खुलासा केला. ते म्हणाले की, अपक्ष धरून भाजपकडे 115 आमदार आहेत. एकनाथ शिंदेंकडे 40 आमदार आहेत. ही संख्या 150 होते. शिवाय 10 अपक्ष आमदार युतीसोबत येतील. म्हणजे ही संख्या 165 होते. त्यातील 16 आमदार कमी झाले तर त्यांच्याकडे 149 आमदार उरतात. बहुमतासाठी 145 आमदारांची गरज आहे. मग कारण नसताना वावड्या उठवण्याचे काम का सुरू आहे, असा सवाल त्यांनी केला.

अमित शहांची भेट कुठे झाली?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी अजित पवार यांची गुप्त भेट झाल्याच्या चर्चेलाही पवार यांनी पूर्णविराम दिला.ते म्हणाले, भेट कुठे झाली? केव्हा झाली? मुंबईत अमित शहा उतरल्यापासून सगळे चॅनेल त्यांच्या पाठीशी होते. तिथून ते विनोद तावडेंच्या घरी गेले. तिथून ते सह्याद्रीला गेले. मी कालच नागपुरात येणार होतो. पण, सभा संध्याकाळी असल्यामुळे अनिल देशमुखांशी बोलणे झाले. जयंत पाटील येत आहेत. एक कार्यक्रम आहे, तो करून दुपारी अनिल देशमुखांकडे आमचे जेवण आहे. त्यामुळे या सगळ्या बातम्या बिनबुडाच्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT