Latest

11 दिवसांनंतर सरकारला जाग ; ससूनमध्ये कैद्यांसाठी ड्रेस कोड

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  ससूनमधील कैद्यांच्या वॉर्ड क्रमांक 16 मध्ये कैदी रुग्ण मनमानी करीत असल्याचे निदर्शनास आले. ड्रग्ज प्रकरणातील कैदी ललित पाटील पळून जाण्यापूर्वी बर्‍याचदा ससूनमधून बाहेर ये-जा करीत होता आणि त्याची प्रशासनाला कल्पना नव्हती, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आरोपीच्या पलायनानंतर आता ससून प्रशासनाला उपरती झाली आहे. कैद्यी वॉर्ड तसेच मानसोपचार वॉर्डमधील रुग्णांसाठी ड्रेस कोड तयार केला जाणार आहे.

ससून रुग्णालयात मुख्य इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर उजव्या बाजूच्या कोपर्‍यात कैद्यांसाठी वॉर्ड क्रमांक 16 आहे. पूर्वी हा व्हीआयपी वॉर्ड होता, तर कैद्यांचा वॉर्ड 27 क्रमांकामध्ये होता. त्यामुळे कैद्यांच्या हालचालींवर, तिथे येणा-या-जाणा-यांवर लक्ष ठेवणे सहजशक्य होते. कैद्यांचा वॉर्ड एका कोप-यात हलवण्यात आल्यावर 'आओ जाओ घर तुम्हारा' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कैद्यांच्या वॉर्डमध्ये केवळ एक नर्स आणि एक सफाई कर्मचारी ड्युटीवर असतात. कैदी रुग्णांना तपासणारे डॉक्टर दिवसातून एकदा राऊंड घेऊन जातात. त्यामुळे दिवसरात्र हा वॉर्ड पोलिसांच्या निरीक्षणाखाली असतो. पोलिसांना हाताशी धरून वॉर्डमध्ये मुक्काम ठोकून असलेल्या कैद्यांचा मनमानी कारभार सुरू असतो.

ललित पाटील वॉर्डमधून बाहेर पडून यापूर्वी अनेकदा लेमन ट्री हॉटेलमध्ये जाऊन येत असल्याचे उजेडात आले. त्याने ड्रग प्रकरण उजेडात आल्यानंतर ससूनमधून पलायन केले. कोणताही कैदी वॉर्डबाहेर आल्यावर ससूनच्या आवारातून बाहेर कसा पडतो, हे न उलगडणारे कोडे आहे. आरोपी पळून गेल्यावर आता ससून प्रशासनाची पाचावर धारण बसली आहे. त्यामुळे यापुढे कैदी बाहेर पडल्यास ओळखू यावेत, यासाठी त्यांच्यासाठी विशेष पेहराव तयार केला जाणार आहे.

नियमांचे पालन होणार का ?
ससूनने ठरवलेला ड्रेस कैद्यांनी घालणे बंधनकारक केले जाणार आहे. ससूनचे हा निर्णय म्हणजे वरातीमागून घोडे पाठवण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. प्रायोगिक तत्वावर या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच केली जाणार आहे. मात्र, राजकीय वरदहस्त असलेले मुजोर कैदी पोशाखाच्या निर्णयाचे पालन करणार का आणि ससून प्रशासन अंमलबजावणीसाठी कठोर निर्णय घेणार का, हे काही दिवसांत समोर येईल.

SCROLL FOR NEXT