Latest

पुणे : शिवरायांच्या विचारांनीच कारभार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : आपण शिवरायांचे मावळे असून, तुमच्यापैकीच एक मावळा आता राज्याचा मुख्यमंत्री झाला आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या विचारांनीच या राज्याचा कारभार सुरू आहे. पुढच्या वर्षी सर्वांना विश्वासात घेऊन नियोजन करण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रासाठीच आदर्श नव्हते, तर ते संपूर्ण देशासाठी आणि समाजासाठी आदर्श आहेत. ज्या आग्य्रातील किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला बाणेदारपणे उत्तर दिले, तोच दिवान-ए-आम यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणार आहे. ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

शिवनेरी गडावर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. किल्ले शिवनेरीवरील शिवजन्मोत्सवासाठी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टरमधून दाखल झाले. यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते बाळ शिवाजींना पाळण्यात घालण्यात आले. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अतुल बेनके, आमदार प्रवीण दरेकर आदी उपस्थित होते.

राज्याच्या पर्यटन विभागाच्या वतीने आयोजित केलेला जन्मोत्सव सोहळा आनंदाचा आणि अभिमानाचा सोहळा आहे. शिवनेरी हे केवळ महाराष्ट्राचेच नाही, तर जगाचे श्रद्धास्थान असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. शिवनेरी ही पवित्र आणि पावन भूमी आहे. तिथे आल्यानंतर आपल्याला शिवरायांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची अनुभूती मिळते आणि मनोमन आपण नतमस्तक होतो. या परिसराचा विकास आणि आराखडा वेळेत पूर्ण होईल, यासाठी सरकारचा सर्वतोपरी प्रयत्न असेल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजन्मोत्सवानिमित्त संपूर्ण राज्यातील शिवभक्त मोठ्या संख्येने किल्ले शिवनेरीवर येतात. त्यामुळे कुणाचीही अडवणूक होणार नाही, याची सरकार नक्की काळजी घेईल. संभाजीराजे यांच्या मागण्यांची राज्य सरकार योग्य ती दखल घेईल. राज्यातील हे सरकार शिवाजी महाराजांच्या विचारांवर स्थापन झाले आहे, त्यामुळेच शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपले सरकार प्रयत्न करीत आहे.

याचाच एक भाग म्हणून सत्तेत आल्यानंतर त्वरित राज्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या एकूण निधीपैकी 3 टक्के निधी दरवर्षी राज्यातील गड-किल्ल्यांच्या संवर्धन व विकासासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला. संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली ज्याप्रमाणे रायगडच्या विकासाचे काम सुरू आहे, त्याप्रमाणेच राज्यातील अन्य गड-किल्ल्यांचा विकास करण्यात येईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

SCROLL FOR NEXT