Latest

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांचे नवे गाणे; ‘आमच्या गाडीला बीरेक न्हाय बरका’

backup backup

पुढारी वृत्तसेवा : 'नका वाकड्यात जाऊ, नका आडवं येऊ, बाजूला सरका…. आमच्या गाडीला बीरेक न्हाय!' साजन बेंद्रे आणि सागर बेंद्रे या बंधूंचं हे गीत सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. या गाण्या च्या व्हिडीओ वर्जन मध्ये भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर हे थिरकताना दिसत आहेत. आमदार पडळकर यांची सध्याची राजकीय भूमिका आणि परिस्थिती पाहता हे गाणे त्यांना तंतोतंत लागू होत आहे.

सध्या राज्यातल्या महायुती सरकार अंतर्गत ज्या काही कुरघोडी सुरू आहेत त्यामध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नवा ताजा संघर्ष चांगलाच उठावदार दिसत आहे. गोपीचंद पडळकर हे साधारणपणे वीस वर्षांपूर्वी सांगली जिल्ह्यातील झरे (ता. आटपाडी) यासारख्या ग्रामीण भागातून पुढे आलेले नेतृत्व. पहिल्यांदा त्यांनी धनगर समाजाचे प्रश्न हिरीरीने पुढे आणले त्यांची ती धमक पाहून राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महादेव जानकर यांनी त्यांना राज्याच्या राजकारणात आणले.

२००९ साली पडळकर यांनी खानापूर मतदार संघाची निवडणूक लढवली. त्यानंतर २०१४ साली थेट बहुजन वंचित आघाडीच्या वतीने प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सांगली लोकसभा निवडणूक लढवली मात्र या दोन्ही निवडणुकीमध्ये त्यांना मतांचा चांगला आधार मिळाला तरी यश आले नाही. त्यानंतर त्यांनी २०१७ मध्ये तत्कालीन भाजप सेना युतीच्या सरकारविरुद्ध राज्यातील बऱ्यापैकी धनगर समाज आपल्या झेंड्याखाली आणत आरक्षणाचा मुद्दा पुढे आणला. त्यावेळी त्यांच्या तोफेचे गोळे एवढे अचूक आणि बिनतोड होते की ते राज्य सरकारला वेळोवेळी घायाळ करीत होते.

राजकारणात चाणाक्ष असलेले तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही गोष्ट ध्यानात घेऊन त्यांना भाजपमध्ये घेतले. पुढे फडणवीस यांनी आपल्याकडे असलेल्या पडळकरांच्या शेलक्या भाषेतील टीकेच्या तोफेचे तोंड वर्षांवर सत्ता भोगलेल्या बारामतीच्या पवार कुटुंबीयांकडे वळविले. ते इतके की भाजपने पडळकर यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत थेट अजित पवार यांच्याविरोधात बारामतीत उभे केले. मात्र तिथे १ लाख ६२ हजाराहून अधिक मतांनी पडळकर यांचा पराभव झाला. त्यानंतर पुढे महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यावेळीही गोपीचंद पडळकर यांनी पवार परिवाराला विशेषत: अजित पवार यांना अत्यंत शेलक्या, कधी शिवराळ आणि असंसदीय भाषेत धारेवर धरले होते. त्याचे बक्षीस म्हणून भाजपने त्यांना २०२० साली आमदार पडळकरांना विधान परिषदेचे प्रतिनिधित्व अर्थात आमदारकी बहाल केली. मात्र सत्तेच्या नव्या सारी पाटात पटत नसलेल्या अनेकांना देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र आणले आहे. मात्र तरीही राज्यात कसेही असले तरी प्रत्येकाला आपापल्या मतदारसंघात आपले स्वतःचे अस्तित्व टिकवायचे आहे. शिवाय आपल्या भागाचा, धर्माचा, जातीचा आधार घेत पुढे जायचे आहे.

याच परिपेक्षात आमदार पडळकर यांची आपल्याच महायुती सरकार विरुद्धचा एल्गार आणि अजित पवार यांच्याविरुद्धची टीका पाहिली पाहिजे. एकतर आमदार पडळकर ज्या खानापूर मतदारसंघातून येतात त्या मतदार संघामध्ये सध्या सत्तेतील सहभागी शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिलराव बाबर स्टँडिंग आमदार आहेत, त्यामुळे येणाऱ्या विधानसभे साठी त्यांचा क्लेम पहिला असेल, शिवाय नुकतेच सत्तेत गेलेल्या अजित पवारांच्या गटा बरोबर माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे चिरंजीव वैभव पाटील गेल्याने मतदार संघाचे चित्र बदलले आहे. शिवाय आटपाडीतून ज्या देशमुख गटाला पडळकर यांनी भाजपमध्ये आणले ते आता आमदार बाबर यांच्याशी सलगी ठेवून आहेत. त्यातच आमदार बाबर यांचा गट जो तानाजी पाटील यांच्या रूपाने आटपाडीत आहे, त्या गटाशी पडळकर यांच्या गटाचा पहिल्यापासून ३६ चा आकडा आहे.

 राज्यभरात सध्या आरक्षण हा विषय गाजतो आहे. धनगर आरक्षणाचा मुद्दा ही ऐरणीवर आला आहे. सर्वत्र आंदोलने सुरू आहेत मात्र या आंदोलनाच्या केंद्रस्थानी नव्हे तर त्या परिघातही आपण नाहीत,ही बाब आमदार गोपीचंद पडळकर यांना सतावत आहे. त्यामुळे त्यांची गाडी आता पुन्हा सरकार विरोधात एल्गारच्या दिशेने पळू लागली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर साजन बेंद्रे, सागर बेंद्रे, रामभाऊ जगताप आणि खुद्द आमदार गोपीचंद पडळकर यांचे 'आमच्या गाडीला बीरेक न्हाय बरका' हे गीत मार्केटमध्ये आले आहे. आता आमदार पडळकर तसे म्हणत असले तरी त्यांच्या गाडीला बीरेक (ब्रेक) लागणार का? हे पाहणे औत्सुक्याचे असेल.

SCROLL FOR NEXT