Latest

चांगली बातमी | जिल्ह्यात १५८ उद्योजकांची १२ हजार ९३ कोटींची गुंतवणूक

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या २०२३- २४ या वर्षात नाशिक जिल्ह्यात तब्बल १५८ उद्योजकांनी सुमारे १२ हजार ९३ कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली. यातून १९ हजार नवीन रोजगार उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (District Investors Summit 2024)

उद्योग संचालनालय व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या समन्वयाने आयोजित केलेल्या 'जिल्हा गुंतवणूकदार परिषद – २०२४' (District Investors Summit 2024) मध्ये ते बोलत होते. येणाऱ्या काळात देश-विदेशातील गुंतवणूकादारांसाठी नेक्स्ट डेस्टिनेशन म्हणून नाशिक असेल. त्यासाठी माझ्यासह जिल्हा यंत्रणा प्रयत्नशील असल्याचेही जिल्हाधिकारी शर्मा यांनी स्पष्ट केले. परिषदेसाठी जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक सतीश शेळके, जीएसटी व मैत्री पार्टनरचे सहआयुक्त लालबहादूर कटारे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील, निमा अध्यक्ष धनंजय बेळे, दीपक बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्सचे संचालक दीपक चंदे आदींसह जिल्हाभरातील उद्योजक व गुंतवणूकदार उपस्थित होते. यावेळी महाव्यवस्थापक संदीप पाटील यांनी, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक यावी यासाठी उद्योग विकास विभागाकडून नियोजन व उद्दिष्टे दिले जात आहेत. त्या अनुषंगाने त्या-त्या जिल्ह्यात जिल्हा गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून कार्यक्रम राबविला जात असून, दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा चार पट गुंतवणूक नाशिक जिल्ह्यात झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (District Investors Summit 2024)

बेळे यांनी जिल्ह्यात दोन हजार हेक्टरपेक्षा जास्त जमीन उद्योगांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच इंडिया बुल्सकडून हजारो एकर जमीन एमआयडीसी ताब्यात घेणार आहे. जिल्हाधिकारी व त्यांची जिल्हा यंत्रणा गुंतवणुकीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण करीत असल्याने, येत्या काळात मुंबई, पुण्यानंतर नाशिक हाच पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कल्स्टर निर्मितीकडेदेखील जिल्हा प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

परिषदेत तज्ज्ञांचे मार्गदर्शन
मैत्री पोर्टर ॲक्ट व डुइंग बिझनेस या विषयावर जीएसटीचे लालबहादूर कटारे यांनी उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन केले. तर देशातील किती प्रमाणात निर्यात केली जाते याविषयी कल्याणी दस्ताने व सूरज जाधव यांनी माहिती दिली. निर्यातीत देशात महाराष्ट्र गुजरातनंतर दुसऱ्या स्थानी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 'स्टार्टअप इनोव्हेशन ॲण्ड इको सिस्टीम' (Startup Innovation and Eco System) या विषयावर डॉ. क्रांतीसागर मोरे यांनी मार्गदर्शन केले.

गुंतवणूकदारांचा सन्मान
परिषदेत रिलायन्ससह जिंदाल, इंडियन ऑइल, ग्लेनमार्कसह सुमारे २५ गुंतवणूकदारांचा सन्मान यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी जिल्ह्यात आणखी गुंतवणूक कशी येणार याबाबत जिल्हा प्रशासन सचोटीने काम करणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT