Latest

‘या’ ज्वालामुखीतून रोज बाहेर पडते पाच लाखांचे सोने

Arun Patil

वॉशिंग्टन : पृथ्वीवरील 'गोल्ड रश' काही नवी नाही. सोने मिळवण्यासाठी आटापिटा करणारे अनेक लोक जुन्या काळापासून पाहायला मिळतात. अशा स्थितीत एखाद्या ज्वालामुखीतून सोने बाहेर पडत आहे हे माहिती असूनही तिथे जाण्याचे धाडस कुणी करीत नाही हे पाहून आपल्याला आश्चर्य वाटू शकेल. अंटार्क्टिकामध्ये हा ज्वालामुखी आहे. त्याच्यामधून रोज 80 ग्रॅम गोल्ड डस्ट बाहेर येत आहे. मात्र, हे सोने जमा करणे सोपे काम नाही. याचे कारण म्हणजे ज्या ज्वालामुखीतून हे सुमारे पाच लाख रुपये किमतीचे सोने बाहेर येत आहे ते ठिकाण कितीतरी फूट उंचीवर आहे. या सक्रिय ज्वालामुखीचे नाव 'माऊंट इरेबस' असे आहे.

'नासा'ने नुकतीच याबाबतची माहिती शेअर केली आहे. अंटार्क्टिकामध्ये अनेक ज्वालामुखी आहेत. माऊंट इरेबसमधील ज्वालामुखीतून रोज 80 ग्रॅम क्रिस्टलाईज्ड गोल्ड म्हणजे सोन्याची भुकटी बाहेर पडते. या सोन्याची किंमत सहा हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे पाच लाख रुपये इतकी आहे.

नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अडमिनिस्ट्रेशन अर्थ ऑब्झर्व्हेटरीनुसार माऊंट इरेबसमध्ये असलेल्या ज्वालामुखीतून रोज वेगवेगळ्या गोष्टी बाहेर पडतात. गोल्ड डस्ट ही त्यापैकीच एक आहे. सोने ओकणारा हा ज्वालामुखी साधारणपणे 12 हजार 448 फूट उंचीवर आहे. गोल्ड डस्ट जिथे जाऊन पडते ते ठिकाण इथून सुमारे 621 मैल दूर आहे. 'नासा'च्या माहितीनुसार ज्वालामुखी फार पातळ क्रस्टवर आहे. या ज्वालामुखीतून कधी कधी दगडेही बाहेर येतात. त्याचा 1972 पासून सातत्याने उद्रेक सुरू आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT