Latest

gold price Increase : सोने 60 हजारांवर; युद्धानंतर पुन्हा 3300 रुपयांनी महागले

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : मागील आठवड्यात इस्रायल -हमास युद्धामुळे सोन्या-चांदीच्या दरात झालेली वाढ अद्यापही सुरूच आहे. सोने खरेदीचा दसर्‍याचा मुहूर्त जवळ आला असताना सोने पुन्हा एकदा 60 हजारांच्या टप्प्यावर पोहोचले असून युद्धामुळे दरातील ही अस्थिरता कायम आहे.

युद्धानंतर सोन्याच्या दरात 3300 रुपये प्रतितोळा तर चांदीच्या दरात 3200 रुपये प्रतिकिलोने वाढ झाली. युद्ध सुरू होण्यापूर्वी (दि. 5) 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह 58 हजार 100 आणि जीएसटीशिवाय 56 हजार 400 रुपये होता. तो गुरुवारी (दि.19 ) जीएसटीसह 61 हजार 500 रुपये जीएसटीशिवाय 59 हजार 710 रुपये झाला आहे.

गुरुवारी चांदीचा दर प्रतिकिलो जीएसटीसह

73 हजार 200 रुपये झाला तर जीएसटीशिवाय 71 हजार 70 रुपये आहे. मागील शुक्रवारी (दि. 13) तो जीएसटीसह 72 हजार 500 रुपये होता तर जीएसटीशिवाय तो 70 हजार 390 होता. युद्ध सुरू होण्याआधी तो जीएसटीसह 69 हजार 200 रुपये आणि जीएसटीशिवाय 67 हजार 180 रुपयेपर्यंत होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर मजबूत झाल्यामुळे युद्धापूर्वी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. पुढील काही दिवस हा ट्रेंड सुरू राहण्याचा अंदाज त्यावेळी बाजारातून व्यक्त केला जात होता. मात्र हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यामुळे मध्य पूर्वेत युद्धाचा भडका उडाला. त्याचे परिणाम सोन्या-चांदीच्या दरावर होत आहेत. युद्ध काळात सोन्याच्या दरात ही अस्थिरता कायम राहणार आहे. दर सतत वाढत असून दोन आठवड्यात सोने दरात 3500 रुपयांची वाढ झाली आहे. सध्या दराबाबत काहीच अंदाज बांधता येतील अशी स्थिती नाही, असे कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेश राठोड यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT