Latest

कौतुकास्पद ! एकादशीमुळे बकरी ईदला पशुहत्या नाही; बैठकीत मुस्लिम समाजाचा मोठा निर्णय

अमृता चौगुले

निघोज(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : हिंदू-मुस्लिम समाजात समन्वय व एकता कायम राहण्यासाठी निघोज येथील मुस्लिम समाजाने बकरी ईदच्या दिवशी पशुहत्या न करण्याचा निर्णय घेतला. समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. रफिक सय्यद यांनी या वेळी प्रवचनाच्या माध्यमातून मुस्लिम-हिंदू एकतेचा मंत्र दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. बकरी ईदच्या दिवशीच एकादशी असल्याने या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. निघोज येथील मशिदीमध्ये शांतता समिती, मुस्लिम समाजबांधव, आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थांची नुकतीच बैठक झाली. पोलिस उपनिरीक्षक हनुमंत उगले अध्यक्षस्थानी होते.

यावेळी डॉ. सय्यद म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वधर्मसमभावासाठी मोठे योगदान दिले असून कोणताही सण असो तो आपण सर्वजण एकत्र येऊन आनंदाने साजरा करतो. यावेळी कोण कोणत्या जातीचा आहे, हे विसरून जातो. एकादशी व बकरी ईद हे दोन्ही हिंदू-मुस्लिम समाजाचे सण यंदा एकाच दिवशी आले आहेत. एकादशीच्या दिवशी आपण उपवास करीत 'सर्वांना सुखी ठेव' ही प्रार्थना करतो. बकरी ईदला आपण पैगंबराजवळ हीच मागणी करतो. मग पशुहत्या करून आपण काय साध्य करतो.

यापेक्षा एकादशी आणि बकरी ईद एकत्र आल्याने पशुहत्या टाळणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आजच्या युवकांना नीतिमत्तेचे धडे देण्याची गरज आहे. यासाठी विद्यालय, महाविद्यालयांत संत तुकाराम महाराज, पैगंबर याविषयी शिक्षण देण्याची गरज आहे. जाती-धर्माच्या आधारावर समाजामध्ये तेढ निर्माण करणार्‍या लोकांच्या प्रबोधनाची गरज असून, सर्वधर्मसमभाव हाच संदेश महत्त्वपूर्ण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

निघोज येथील मुस्लिम समाजाने बकरी ईदच्या दिवशी पशुहत्या न करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पोलिस उपनिरीक्षक उगले यांनी आभार मानले. समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणार्‍या लोकांना शासन होणार आहे. आपण सर्वधर्मसमभाव वृत्ती जोपासत राज्याच्या व देशाच्या विकासासाठी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले. पोलिस हवालदार गणेश डहाळे, पोलिस अंमलदार मयूर तोरडमल व अमित कडूस आदी उपस्थित होते. मुस्लिम समाजाचे शहराध्यक्ष रफिकभाई हवालदार यांनी आभार मानले.

सर्वधर्मीयांमध्ये समन्वय असणारे गाव

निघोज येथील मंळगंगा देवी यात्रा उत्सव, उरूस व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निघोज ग्रामस्थ एकत्र साजरी करून गेलेय अनेक वर्षांची सर्वधर्मसमभाव वृत्ती जोपासण्याचे काम करीत आहेत. सर्वधर्मीयांमध्ये समन्वय असणारे निघोज हे सर्वाधिक लोकसंख्या असलेले तालुक्यातील गाव आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT